Monday, 13 August 2012

Munich Massacre...

५ सप्टेंबर १९७२ - म्युनीच - जर्मनी.
आजचा दिवस ऑलंपीक इतिहासातला एक काळा दिवस म्हणून नोंदला जाईल याची कुणाला पुसटशीही कल्पना नव्हती.
२६ ऑगस्ट १९७२ ला सुरू झालेल्या ऑलंपीकला दीड आठवडा होवून गेला होता. आयोजक, स्पर्धक, प्रेक्षक दर चार वर्षांनी होणार्‍या या महोत्सवात जोशाने सहभागी झाले होते.
मार्क स्पिट्झ ने जलतरण स्पर्धेतील सात वेगवेगळ्या प्रकारात विश्वविक्रम करत सातही सुवर्णपदके पटकावून खळबळ उडवून दिली होती. कोणत्याही खेळाडूने केलेली आत्तापर्यंतची ही सर्वोच्च ऑलंपीक कामगिरी. (हा विक्रम पुढे २००८ पर्यंत; माईकल फेल्प्सपर्यंत अबाधित राहिला.)
Rowing, Diving, Swimming, Gymnastics वगैरे खेळांच्या सर्व स्पर्धा संपल्या होत्या व एकूण १७ दिवस चालणार्‍या या स्पर्धेची सांगतेकडे वाटचाल सुरू होती.
सगळे सुरळीत सुरू असताना अचानक इस्रायली खेळाडूंवरील हल्ल्याच्या बातमीने सर्वजण हादरून गेले.
इस्राईलच्या दोन खेळाडूंची हत्या आणि बाकी नऊ जण (इस्रायली खेळाडू, कोच व रेफ्री) ओलीस - खुद्द ऑलंपीक व्हिलेजमध्ये!!
सर्व स्पर्धाप्रकार तातडीने थांबवले गेले. अचानक स्पर्धा थांबवली जाण्याची ही बहुदा पहिलीच वेळ.
या नाट्याला पहाटे पहाटे सुरूवात झाली. स्पोर्ट्स बॅग घेतलेल्या आठ 'खेळाडूंनी' ऑलंपीक व्हिलेजमध्ये प्रवेश केला. ट्रॅकसूट व संपूर्णपणे खेळाडूसारखा पेहराव असल्याने कुणाला काहीच शंका आली नाही. निर्धोकपणे हे सर्वजण इस्रायली खेळाडूंच्या निवासस्थानापाशी पोहोचले. या सर्व दहशतवाद्यांनी स्वतःचे खेळाडूंमध्ये इतके बेमालूम वेशांतर केले होते की ऑलंपीक व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना एका सहा सात फुटी कुंपणावरून उड्या माराव्या लागल्या व हा 'शॉर्टकट' तिथल्याच काही अमेरीकन (खर्‍या) खेळाडूंनी अजाणतेपणे या दहशतवाद्यांना दाखवला - आपल्यासारखेच खेळाडू समजून.
या इमारतीत व शेवटच्या मधल्या खिडकीच्या खोलीत हे सगळे नाट्य सुरू झाले.

बनावट किल्लीच्या सहाय्याने दहशतवाद्यांनी इमारतीत प्रवेश मिळवला. प्रवेश मिळाल्यानंतर काही मिनीटातच अत्यंत चपळाईने हालचाली करत सगळेजण ग्रेनेड, पिस्टल्स आणि राईफल ने शस्त्रसज्ज झाले. हा सगळा साठा स्पोर्ट्स बॅगांमध्ये लपवला होता. दहशतवाद्यांनी आता मोर्चा खेळाडूंच्या खोल्यांकडे वळवला व हाती असलेल्या किल्ल्यांच्या सहाय्याने दरवाजे उघडण्याची खटपट करू लागले. या आवाजाने एक रेफ्री - Yossef Gutfreund जागा झाला. दारापाशी होणारा आवाज व गडबड कशाची आहे हे पहायला गेल्यावर त्याला दारातून आत येण्याचा प्रयत्न करणारा व चेहरा झाकलेला एक दहशतवादी दिसला व त्या दहशतवाद्याच्या हातातील AKM (AK-47 चे एक भावंड) राईफल ही डोकावत होती. Yossef ने ओरडून आपल्या सहकार्‍यांना जागे केले, एक जड वजन दरवाज्याच्या आतील बाजूने लावले व हाताने दरवाजा घट्ट बंद करून मदतीसाठी आरडाओरड करू लागला.
हे आवाज ऐकून वेटलिफ्टींग कोच Tuvia Sokolovsky एक काचेची खिडकी तोडून पळून गेला.
८ दहशतवाद्यांच्या ताकतीपुढे एकट्या Yossef चे प्रयत्न अपुरे पडले व दहशतवाद्यांनी खोलीत प्रवेश मिळवला. Yossef ला बंदी बनवून ते बाकीच्या खेळाडूंचा शोध घेवू लागले. पुढचा नंबर होता Yossef एक सहकारी Moshe Weinberg . या कुस्तीच्या कोच ने प्रतिकार करायचा प्रयत्न केला, एका दहशतवाद्याने Moshe च्या गालात गोळी मारून त्याला जखमी केले व त्याला सोबत घेवून आणखी खेळाडूंचा शोध सुरू केला. यादरम्यान काही इस्रायली खेळाडू काय घडते आहे याचा अंदाज आल्याने मिळेल त्या मार्गाने पळून गेले.
Moshe ने प्रसंगावधान राखत या दहशतवाद्यांना दुसर्‍या खोलीकडे न नेता सरळ तिसर्‍या खोलीमध्ये नेले जिथे सहा रेसलर्स आणि वेटलिफ्टर्स होते. कदाचित् Moshe ला त्या सशक्त खेळाडूंकडून प्रतिकाराची अपेक्षा असावी पण ते सर्वजण झोपेतून नुकतेच जागे झाल्याने गोंधळून गेले व कोणताही प्रतिकार न करता दहशतवाद्यांच्या स्वाधीन झाले.
Moshe व सर्व ओलीस घेवून दहशतवादी पुन्हा पहिल्या खोलीकडे येताना Moshe ने पुन्हा हल्ला करून एका दहशतवाद्याला बेशुध्द केले व दुसर्‍यावर तिथल्याच एका सुर्‍याने वार केले. दहशतवाद्यांनी बंदूकीच्या सहाय्याने Moshe ला शांत केले - कायमचे.
आणखी एक वेटलिफ्टर Yossef Romano ने ही प्रतिकार करून एका दहशतवाद्याला जखमी केले पण लगेचच Yossef वर गोळ्या झाडून त्याचाही कायमचा बंदोबस्त केला गेला.
या गडबडीचा फायदा घेवून दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेला Gad Tsobari हा रेसलर सुटका करून घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला.
दोन खेळाडू ठार व नऊ जण ओलीस.
रक्ताळलेली सकाळ उजाडली.
हळूहळू एक एक गोष्टी उजेडात येवू लागल्या. "ब्लॅक सप्टेंबर" या पॅलेस्टाईन गटाच्या दहशतवाद्यांनी हे सगळे घडवून आणले होते. अपुरी व ढिली संरक्षण व्यवस्था आणि एका बाजूला असलेले इस्रायली खेळाडूंचे अपार्टमेंट याचा पुरेपूर फायदा घेत दहशतवाद्यांनी हा रक्तपात घडवून आणला होता व इस्राईल पॅलेस्टाईन संबंध बघता हा रक्तपात इथेच थांबणार नाही याचीही सर्वांना खात्री पटली होती.
दहशतवाद्यांच्या हातात नऊ निष्पाप खेळाडू सापडले होते आणि केवळ त्यांचे "ज्यू" व "इस्रायली " असणे दहशतवाद्यांना पुरेसे होते.
Ze'ev Friedman (वेटलिफ्टर)
David Berger (वेटलिफ्टर)
Yakov Springer (वेटलिफ्टींग जज)
Eliezer Halfin (रेसलर - कुस्तीपटू)
Yossef Gutfreund (रेसलींग रेफ्री)
Kehat Shorr (शूटींग कोच)
Mark Slavin (रेसलर)
Andre Spitzer (फेन्सींग कोच)
Amitzur Shapira (ट्रॅक कोच)
या नऊ खेळाडूंच्या हातापायांना व नंतर एकमेकांना बांधून त्यांचा संपूर्णपणे ताबा घेवून दहशतवादी पुढच्या कामाला लागले. सर्व खेळाडूंनी आपले भवितव्य हताशपणे नियतीकडे सोपवले होते.
प्रतिकार करणार्‍या Moshe Weinberg च्या गालावर गोळी मारून त्याला जायबंदी करणार्‍या व नंतर त्याला निर्दयीपणे ठार मारणार्‍या दहशतवाद्यांचा कृरपणा खेळाडूंना बंदी बनवल्यानंतरही सुरूच राहिला. बंदूकीच्या धाकाने काही खेळाडूंना अत्यंतीक मारहाण केली गेली, घृणास्पद प्रकार म्हणजे आधीच मरण पावलेल्या Yossef Romano चे गोळ्यांनी चाळण झालेले व रक्ताने माखलेले शव बंदी खेळाडूंच्या पायाशी आणून टाकून दिले गेले, या सर्व खेळाडूंना जरब बसावी म्हणून.
दहशतवाद्यांनी मागण्या जाहीर केल्या. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या २३४ पॅलेस्टीनीयन कैद्यांची सुटका करून त्यांना इजिप्तला पोहोचवणे व जर्मनीच्या ताब्यात असलेल्या दोन कैद्यांची सुटका.
इस्रायलने त्यांच्या त्या वेळच्या धोरणाप्रमाणे लगेचच नि:संदिग्ध शब्दात उत्तर दिले..
"कोणत्याही वाटाघाटी केल्या जाणार नाहीत"
(एकदा वाटाघाटी करण्याचे धोरण अवलंबले की भविष्यातली परिस्थीती आणखी गुंतागुंतीची होते हा या धोरणामागचा विचार!)
आपल्या मागण्यांमागचा गंभीरपणा अधोरेखीत करण्यासाठी दहशतवाद्यांनी Moshe चे मृत कृरपणे अपार्टमेंट बाहेर टाकून दिले.
सर्व ओलीस ज्यू असल्याने जर्मनी ची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली. जर्मनी ने ज्यू खेळाडूंच्या बदल्यात अमर्यादीत पैसा देवू केला, उच्चपदस्थ जर्मन ऑफिसर्स ओलीसांच्या बदल्यात ओलीस म्हणून देवू केले पण दहशतवाद्यांनी आपला निर्णय बदलला नाही.
वाटाघाटी करण्यास नकार देणारा इस्राईल..
निर्णय न बदलणारे दहशतवादी..
जर्मनीचे त्यावेळचे नेतृत्व..
संपूर्ण ऑलंपीक..
आख्खे जग..
काहीतरी चमत्कार घडून हे कोडे सुटावे, ही परिस्थिती बदलावी अशी इच्छा करत होते.. आपआपल्या देवांना प्रार्थना करत होते...


Munich Massacre च्या घटनेचे प्रतिनिधित्व करणारे छायाचित्र.
परिस्थिती पुढे सरकण्यासाठी काहीतरी घडणे गरजेचे होते. अचानक ओलीसांच्या अपार्टमेंटची एक खिडकी उघडली आणि काही कागद फेकले गेले. ते दहशतवाद्यांचे मागणीपत्र होते. यावर इस्राईलच्या ताब्यातल्या २३४ कैद्यांची नावे टाईप केली होती. दहशतवाद्यांबद्दलही माहिती होती. "ब्लॅक सप्टेंबर" या क्रूर दहशतवादी गटाने हे अपहरण केले होते. यांचे नेतृत्व करत होता इस्सा (Luttif Afif) आणि त्याचा उजवा हात होता टोनी (Yusuf Nazzal.)
दहशतवाद्यांची ओळख पटली आणि एक एक धक्कादायक गोष्टी उजेडात येवू लागल्या.
दहशतवाद्यांपैकी कांही जण ऑलंपीक स्टेडीयम मध्ये वर्कर म्हणून काम करत होते. ऑलंपीक व्हिलेजची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे होती. त्याहीपुढची बाब म्हणजे एक दहशतवादी इस्रायली खेळाडूंच्या अपार्टमेंट मध्येच हल्ल्याच्या आधी कांही तास वावरत होता - वर्कर म्हणून.
त्याच अपार्टमेंट मध्ये रहाणारे उरूग्वे आणि हाँगकाँगचे खेळाडू सुखरूप बाहेर पडले आणि इस्राईल हेच लक्ष्य आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखीत झाली.
किती खेळाडू ओलीस ठेवले गेले आहेत याची खात्रीशीर माहिती कुणालाच नव्हती. ओलीसांपैकी किती जण सुरक्षीत आहेत, किती जण जखमी आहेत या बाबत उलटसुलट अफवा बाहेर पसरल्या होत्या आणि या सर्व अफवा न्यूज रिपोर्टर्स छातीठोकपणे प्रक्षेपीत करत होते. अफवांमध्ये अफवांचीच भर पडतच होती आणि हे सगळे नाट्य दहशतवादी ओलीसांसोबत "लाईव्ह" बघत होते. ४००० रिपोर्टर्स आणि २००० कॅमेरा क्रू ची अक्षरश: जत्रा भरली होती.
नक्की किती दहशतवादी आहेत हे ही अजूनही स्पष्ट झाले नव्हते.
वाटाघाटींचे आणखी प्रयत्न सुरू झाले.
वाटाघाटींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक कमिटी स्थापन केली गेली या कमिटीमध्ये एक पोलीस प्रमुख Manfred Schreiber (श्रायबर) व दोन (राजकारणातले) मंत्री होते.
चेहरा ओळखू नये म्हणून चेहर्‍याला बूटपॉलीश लावलेले, स्कार्फ आणि मास्कने चेहरा लपवलेले दहशतवादी पोलीसांशी बोलू लागले. इस्साने पहिली वेळ दिली होती दुपारी १२ वाजताची. अपहरण केल्यापासून केवळ ७ तासात मागण्या पूर्ण होण्याचा हट्ट त्याला सोडावा लागला. ही वेळ पुढे ढकलली गेली. पोलीस प्रमुख श्रायबर ने इस्राईल 'हो' म्हणत आहे, 'सहकार्य करत आहे' अशी थाप मारून आणखी वेळ मिळवला. असा वेळ आणखी पाच वेळा मिळवला गेला... डेडलाईन पाच वेळा पुढे ढकलण्यात श्रायबर यशस्वी ठरला.
वाटाघाटी हळूहळू पुढे सरकत होत्या, ऑलंपीकमधले कांही स्पर्धाप्रकार मात्र अजूनही सुरूच होते. सगळीकडून वाढत्या दबावामुळे शेवटी ते थांबवले गेले. ऑलंपीक व्हिलेजमधले वातावरण खूप निवांत आणि आराम होते. या घटनेचा मागमूसही कुठे दिसत नव्हता. खेळाडू सराव करत होते, बीच वर पहुडल्यासारखे निवांतपणे ऊन खात पडले होते आणि विक्रेते खाद्यपदार्थ विकत होते आणि या सगळ्याचेही "थेट प्रक्षेपण" सुरू होते. ओलीसांच्या अपार्टमेंटबाहेर गर्दी वाढतच होती. घटनेचे गांभीर्य बहुदा लक्षात आले नव्हते किंवा न लक्षात आल्यासारखे सगळे वातावरण होते.
इस्सा बरोबर वाटाघाटींचे बरेच प्रयत्न झाले. सगळे दहशतवादी अत्यंत आत्मविश्वासू आणि ठाम दिसत होते. चर्चेत कोणतीही गोष्ट सहजासहजी मान्य करत नव्हते आणि कोणताही कच्चा दुवा समोर येवून देत नव्हते.
कोणतीही माहिती मिळत नाही हे पाहून क्रायसीस टीम ने आणखी एक शक्कल लढवली व ओलीस जिवंत आहेत का याची खात्री करून घेण्यासाठी ओलीसांशी प्रत्यक्ष बोलण्याचा आग्रह धरला. जर्मन बोलणर्‍या Andre Spitzer ला खिडकीजवळ हात बांधलेल्या अवस्थेत उभे केले गेले, दोन दहशतवादी बंदुका ताणून मागे उभे होते. संभाषण सुरू झाले..

"जिवंत ओलीसांची संख्या किती आहे?" या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करताना Andre ला मारहाण करत मागे ओढले गेले व खिडकी बंद झाली.
पुन्हा वाटाघाटींचे गुर्‍हाळ सुरू झाले. श्रायबर पुन्हा इस्साशी बोलण्याचा, त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला.
संध्याकाळचे पाच वाजले... वाटाघाटींचे फलीत म्हणजे दोन ऑलंपीक अधिकार्‍यांना आत येवून खेळाडूंची पाहणी करून देण्यासाठी इस्साने होकार दिला. श्रायबर पोलीस असल्याने त्याला इस्साने प्रवेश नाकारला.
आत अत्यंत हृदयद्रावक दृश्य होते. भिंतीवर; जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता, गोळीबाराने भिंतीचे पोपडे पडले होते, झटापटीच्या खुणा होत्या आणि रक्ताने माखलेले एक प्रेत पडले होते.

हातापा यांना बांधलेले ओलीसांना एका खोलीत एकत्र बसवले होते. दहशतवाद्यांचा सर्वत्र पहारा होता. आत जाणार्‍या एका अधिकार्‍याला श्रायबर ने एक विशेष काम दिले होते. आत किती दहशतवादी आहेत हे मोजायचे. या अधिकार्‍याला चार किंवा पाच दहशतवादी दिसले. बाहेर आल्यावर त्याने ही माहिती श्रायबर ला दिली. त्या क्षणापासून "चार किंवा पाच" दहशतवादी गृहीत धरून सगळी गणिते आखली गेली...
इस्राईल अजूनही आपल्या निर्णयावर ठाम होते. इस्राईलने स्वत:ची कमांडो टीम पाठवण्याची तयारी जर्मनीकडे दर्शवली, जर्मनीने ही विनंती अमान्य केली.
शेवटी जर्मनीनेच पुढाकार घेत एक रेस्क्यू टीम पाठवून ओलीसांची सुटका करण्याचा निर्णय घेतला.
ट्रॅकसूट घातलेल्या व सब मशिनगन ने सज्ज झालेल्या जर्मनीच्या पोलीसांचे पथक बोलावले गेले.



अपार्टमेंटच्या आजूबाजूला व छतावर "पोझीशन्स" घेवून ते पुढच्या आदेशाची वाट बघू लागले.


बाहेर काहीतरी घडते आहे याची जाणीव दहशतवाद्यांनाही झाली होती. अचानक श्रायबरच्या लक्षात आले रेस्क्यू टीम चा ठावठिकाणा त्यांना तंतोतंत कळत होता व त्या अनुषंगाने ते बाल्कनीत येवून छताकडे बघत होते. हेही उघड झाले की रेस्क्यू टीम च्या तयारीपासून ते पोझीशन्स पर्यंत सगळ्या गोष्टी "थेट प्रक्षेपीत" केल्या गेल्या होत्या.
रेस्क्यू टीमला मागे घेतले नाही तर दोन ओलीसांना ठार मारण्याची धमकी इस्साने दिली.
रेस्क्यू मिशन अचानकपणे सुसाईड मिशन मध्ये बदलले गेलेले पाहून, रेस्क्यू टीमला तातडीने मागे बोलावले गेले. हल्ल्याच्या आदेशांची वाट बघणार्‍या रेस्क्यू टीमला आदेश मिळाले ते मिशन रद्द झाल्याचे. ओलीसांच्या सुटकेचे सर्व प्रयत्न थांबवले गेले.
वेळ निघून जात होता. काहीतरी होवून कोंडी फुटण्याची सर्वजण वाट बघत होते.
अचानक संध्याकाळी उशीरा इस्साने एका विमानाची मागणी केली व कैरो (इजिप्त) येथे जाण्याची मागणी केली.
ओलीसांना कोणत्याही परिस्थीतीत या प्रकारे जर्मनीबाहेर जावून देण्याची तयारी जर्मन सरकारची नव्हती. दहशतवादी ऑलंपीक व्हिलेज पासून विमानतळापर्यंत दोन हेलीकॉप्टर व तिथून पुढे एका मोठ्या विमानाने कैरोला जाणार होते. ओलीसांच्या सुटकेसाठी आणखी एक प्रयत्न करायचे पोलीसांनी ठरवले. दहशतवादी व ओलीस अपार्टमेंट पासून हेलीकॉप्टरपर्यंत पायी चालत जाताना दहशतवाद्यांवर हल्ला करायचा असा प्लॅन ठरला. इस्साने या मार्गाचे आधी निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जर्मन सरकारचा हा प्रयत्नही फसला.
या मार्गावर लपून बसलेले सगळे जर्मन अधिकारी हटवण्यात आले.
जर्मन पोलीसांची हल्ल्याची तयारी बघून इस्साने पायी जाण्यास नकार दिला व अपार्टमेंट पासून हेलीकॉप्टरपर्यंत चे केवळ २०० मीटर अंतर जाण्यासाठी बसची मागणी केली.
ओलीसांना घेवून दहशतवादी बसमध्ये चढले आणि एक धक्कादायक गोष्टीचा उलगडा झाला. ओलीसांचा ताबा एकूण आठ दहशतवाद्यांनी घेतला होता. "चार किंवा पाच दहशतवादी" या तयारीने असलेल्या सर्वांनाच हा जबरदस्त धक्का होता.
विमानतळाकडे जाण्यासाठी हेलीकॉप्टर्सनी टेक ऑफ घेतला आणि "मिडीया सर्कस" ही त्यांचा पाठलाग करत विमानतळाकडे निघाली.
तिकडे विमानतळावर आणखी एका रेस्क्यू प्लॅनची तयारी सुरू होती... कैरोला जाणार्‍या विमानातील संपूर्ण स्टाफची जागा वेष बदललेल्या जर्मन पोलीसांनी घेतली. कंट्रोल टॉवरवर तीन स्नायपर सज्ज केले गेले. आणखी एक स्नायपर विरूध्द दिशेला रनवेवर एका ट्रकच्या मागे आणि एक स्नायपर जमिनीवर एका अगदी छोट्या फूटभर उंचीच्या भिंतीच्या आडोशाला (झोपून) लपला होता.
इस्सा विमानाची तपासणी करायला गेला की त्याच्यावर विमानातील अधिकारी हल्ला करतील व बाकीच्या दहशतवाद्यांना स्नायपर्स टिपतील असा प्लॅन ठरला.
ऑलंपीक व्हिलेज ते विमानतळ हे २५ किमीचे अंतर पार करून हेलीकॉप्टर्स विमानतळावर पोहोचली आणि कंट्रोल टॉवरसमोर उतरली. विमानाची तपासणी करण्यासाठी इस्सा आणि एक दहशतवादी विमानाकडे गेले. आश्चर्यकारकरीत्या विमानात कोणीही नव्हते, रिकामे विमान बघून इस्साला धोक्याची जाणीव झाली.
शक्य तेवढ्या वेगाने तो व त्याचा सहकारी हेलीकॉप्टर कडे धावू लागले....
अचानक विमानतळाचा परिसर प्रखर प्रकाशाने उजळून निघाला आणि... प्रचंड गोळीबारास सुरूवात झाली...

रात्री १०:३० वाजता विमानतळावर सगळे नाट्य सुरू झाले.
विमानाची तपासणी करायला गेलेले इस्सा आणि टोनी हेलीकॉप्टरच्या दिशेने धावत होते..
कंट्रोल टॉवरवरच्या एका स्नायपरने इस्सा आणि दुसर्‍याने टोनीला लक्ष्य बनवून गोळ्या झाडल्या. मांडीत गोळी लागल्याने टोनी जखमी झाला व रनवेवर कोसळला. तरीही तो कसाबसा उठला व धडपडत एका हेलीकॉप्टरच्या मागे पोहोचण्यात यशस्वी झाला. इस्साही सुखरूप हेलीकॉप्टर जवळ पोहोचला.
विमानाची तपासणी करायला गेलेल्या इस्सा आणि टोनीला विमानातले पोलीस जेरबंद करणार आणि राहिलेल्या "दोन किंवा तीन" दहशतवाद्यांना पाच स्नायपर ठार मारणार असा जर्मन पोलीसांचा प्लॅन पुरेपूर फसला. एकूण आठ दहशतवादी होते आणि आठ दहशतवाद्यांसाठी पाच स्नायपर अपुरे होते. दहशतवाद्यांचा खरा आकडा तीस मिनीटे आधी संपूर्ण जगाला कळाला होता पण विमानतळावरील स्नायपर्स पर्यंत ही माहिती पोहोचली नव्हती. कारण...? कारण त्यांच्याकडे संपर्कासाठी रेडीओ नव्हते. सगळे स्नायपर्स अजूनही "चार किंवा पाच" दहशतवाद्यांच्या प्रतिक्षेत होते. इस्साच्या आदेशावरून आता दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरू केला. गोळ्या कंट्रोल टॉवर वरून येत आहेत हे पाहून कंट्रोल टॉवर व त्याच्या जवळील लाईट्सवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यादरम्यान दहशतवाद्यांनी झाडलेली एक गोळी कंट्रोल टॉवरच्या तळमजल्यावर बंदोबस्ताला असलेल्या एका पोलीस अधिकार्‍याला डोक्यात लागली व तो तत्काळ मरण पावला. "चार किंवा पाच" ऐवजी "आठ" दहशतवादी प्रत्यूत्तर देवू लागल्यानंतर स्नायपर्स ही गडबडले व जमेल तसे तेही प्रत्यूत्तर देवू लागले.
कंट्रोल टॉवरवरून स्नायपरही गोळीबार करत होते, मात्र विमानतळावरचे लाईट्स आणि चुकीच्या पध्दतीने लँड झालेली हेलीकॉप्टर्स त्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी करत होते, नेम धरून गोळ्या झाडणे (Precision Shots) स्नायपर्सना कठीण जात होते. त्यामुळे दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबाराला तेही अंदाधुंदपणेच उत्तर देत होते. सुदैवाने दहशतवाद्यांना गोळ्या लागत होत्या, दहशतवादी जखमी होत होते. सर्वत्र गोंधळ माजला होता.
हे सर्व नाट्य ओलीस हेलीकॉप्टरमध्ये बसून पाहत होते... हात पाय बांधलेल्या अवस्थेत, असहाय्यपणे.
विमानतळावर काय घडते आहे याचे अंदाज बांधून विमानतळाबाहेर असलेली "मिडीया सर्कस" त्या बातम्याही "थेट प्रक्षेपीत" करत होती.
रात्रीचे ११ वाजले.. गोळीबाराला थोडा वेळ उसंत मिळाली. संधी पाहून हेलीकॉप्टरचे पायलट पळून गेले आता फक्त अपहरणकर्ते आणि ओलीस राहिले. ओलीसांनी दातांच्या सहाय्याने दोर सैल करायचा.. सोडवायचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही.
एक तास भयाण शांततेत गेला.
अचानक दहशतवाद्यांना काही चिलखती गाड्या रनवेवर येताना दिसल्या. ते घाबरले व त्यांना आपण पकडले जाणार याची जाणीव झाली.
एक दहशतवादी पहिल्या हेलीकॉप्टरकडे तर आणखी एक जण दुसर्‍या हेलीकॉप्टरकडे धावला. हेलीकॉप्टरमध्ये चढून खूप जवळून खेळाडूंवर गोळ्या झाडल्या. सर्वजण काही क्षणात मरण पावले. दुसर्‍या हेलीकॉप्टरमध्ये याचीच पुनरावृत्ती झाली फक्त या दहशतवाद्याने आणखी एक पराक्रम केला. या हेलीकॉप्टरमधल्या खेळाडूंवर गोळ्या झाडून त्याचे समाधान झाले नसावे. त्याने स्वत:जवळचा एक हँड ग्रेनेड घेतला, पीन काढली व हेलीकॉप्टरमध्ये खेळाडूंच्या पायाशी भिरकावला..
मो ऽ ऽ ठ्ठा स्फोट झाला.
हेलीकॉप्टरसह आतल्या खेळाडूंच्या अक्षरश: राख झाली. गोळीबारातून वाचले ते खरे दुर्दैवी ज्यांना या यातना जिवंतपणी भोगाव्या लागल्या.
स्फोट झाल्यानंतर झालेली हेलीकॉप्टरची अवस्था.

कंट्रोल टॉवर, आसपासचा परिसर आणि बेचीराख झालेले हेलीकॉप्टर...
("C" मार्क असलेल्या इमारतीच्या वरच्या भागात तीन स्नायपर्स व दोन्ही हेलीकॉप्टर्सच्या शेपटाच्या दिशेने जमिनीवर एक एक स्नायपर तैनात केले होते)

पुन्हा गोळीबार सुरू झाला... अखेर कंट्रोल टॉवरवरच्या स्नायपर्सना यश मिळाले. इस्साला गोळी लागली व तो रनवे वर कोसळला. टोनी व बाकीचे सहकारी गोळीबार करतच होते. आणखी काही दहशतवादी गोळ्या लागून कोसळले. एकूण चार दहशतवादी ठार झाले. चार जण अजूनही जिवंत होते, जखमी होते पण जिवंत होते.
एकही खेळाडू जिवंत नाही ही खात्री पटल्यावर ठार न झालेले तीन दहशतवादी पोलीसांना शरण गेले.
गंभीर जखमी अवस्थेत टोनीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला पोलीसांनी घेरले व दरम्यान झालेल्या गोळीबारात टोनी ठार झाला. पहाटे पहाटे सुरू झालेल्या घडामोडी रात्री ०१:३० वाजता संपल्या. एकूण १७ जीव घेवून.
बाहेर उलटसुलट बातम्या येतच होत्या, दुर्दैवाने सत्यता पडताळून न पाहता त्या प्रक्षेपीत होत होत्या आणि सगळेजण त्या बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवत होते.
अचानक एक बातमी आली की सर्व ओलीस सुरक्षीत आहेत आणि दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आले आहे. सगळीकडे जल्लोश सुरू झाला. ऑलंपीक व्हिलेजमध्ये ही बातमी पोहोचली. जर्मनीमध्ये, इस्राईलमध्ये आणि जगभर ही बातमी पोहोचली. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. इस्राईलच्या राजदूतांनी सर्वांचे अभिनंदन केले. अभिनंदनाचा स्वीकार करायला एका व्यक्तीने स्पष्ट नकार दिला...
अँकी स्पिट्झर. फेन्सींग कोच अँड्रे स्पिट्झरची पत्नी.

जोपर्यंत अँड्रेशी प्रत्यक्ष बोलणे होत नाही तोपर्यंत कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायला अँकी तयार नव्हती.
विमानतळावर हळूहळू अ‍ॅम्ब्यूलन्स आणि पोलीसांच्या गाड्यांची वर्दळ वाढू लागली. अधिकृत व खरी बातमी आली, रात्री ०३:३० च्या दरम्यान..
"सर्वच्या सर्व खेळाडू विमानतळावर मरण पावले"
जल्लोश करणारे इस्रायली दु:खात बुडून गेले. ऑलंपीक स्पर्धेतील एक काळा दिवस संपला.
या गुणी खेळाडूंना कायमचे नाहीसे करून.

जर्मनीच्या विमानतळावर असलेले खेळाडूंचे स्मारक.

काही तासातच दुसरा दिवस उजाडला. सकाळी खेळ सुरू होण्याच्या वेळेस ऑलंपीक स्टेडीयममध्ये ८० हजार प्रेक्षक आणि ३ हजार खेळाडूंच्या उपस्थितीत शोकसभा सुरू झाली. मरण पावलेल्या खेळाडूंचा ओझरता उल्लेख करून ऑलंपीक चळवळ किती मजबूत आहे आणि त्याची महती वगैरे वगैरे भाषण सुरू झाले. या सभेला इस्रायली खेळाडूंचे नातेवाईक ही हजर होते. यांपैकी कार्मेल इलियाह या मोशे वाईनबर्ग च्या बहिणीला (Cousin) ला हा ताण सहन झाला नाही, रडत रडतच ती कोसळली व हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावली.
सकाळी जर्मनीला पोहोचून अँकी सुध्दा शोकसभेला हजर होती.
मृत खेळाडूंना मानवंदना देण्यासाठी आणि शोक दर्शवण्यासाठी ऑलंपीकचा ध्वज आणि सर्व सहभागी देशांचे ध्वज अर्ध्यावर आणले गेले.

१० मुस्लीम / अरब राष्ट्रांनी त्यांचे ध्वज अर्ध्यावर आणण्यावर आक्षेप घेतला. त्यांचे ध्वज लगेचच वर घेतले गेले.
(या दरम्यानची उल्लेखनीय बाब म्हणजे मुस्लीम / अरब राष्ट्रांपैकी फक्त जॉर्डनचे राजे किंग हसन यांनी या हत्याकांडाचा स्पष्ट शब्दात निषेध केला)
काही न घडल्याप्रमाणे खेळ सुरू झाले. या घटनेमुळे इतर देशांचेही अनेक खेळाडू ऑलंपीक सोडून परत फिरले. काही खेळत राहिले. खूप थोड्या खेळाडूंनी हेही मान्य केले की त्यांची खेळण्याची, स्पर्धा करण्याची इच्छाशक्ती मरून गेली आहे पण ते स्पर्धेत थांबले.
जड मनाने इस्रायली टीम परत फिरली. त्यांच्यासाठी एक दु:खद अध्याय संपला होता.
पण काहीजणांसाठी हा अध्याय इथेच संपणार नव्हता.. ही तर सुरूवात होती.
इस्त्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर आणि मोस्साद 'इस्रायली मार्ग' शोधण्यात गुंतले आणि अँकी स्पिट्झर तिचा स्वत:चा...
म्यूनीकमध्ये पोहोचल्यावर अँकीने इस्रायली खेळाडूंच्या अपार्टमेंटला भेट दिली; जिथे दोन खेळाडूंची हत्या झाली होती, जिथे सर्वांना ओलीस ठेवले गेले होते व जिथे जगाने अँड्रे स्पिट्झरला खिडकीतून ऑलंपीक अधिकार्‍यांशी बोलताना शेवटचे जिवंत बघितले होते.

पुढे २० वर्षे अँकीने जर्मन सरकारचा सतत पिच्छा पुरवला. या घटनेचा अधिकृत अहवाल मिळावा म्हणून जंग जंग पछाडू लागली. अँकीची एक खूप साधी अपेक्षा होती. या घटनेची जबाबदारी कुणीतरी स्वीकारावी. पण तिच्या हाती काहीच लागले नाही. जर्मन सरकारने असा कोणताही अहवाल नाही हेच पालूपद कायम ठेवले. अचानक १९९२ च्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती अँकीला या घटनेचे जर्मनीचे सरकारी अहवाल आणि कागदपत्रे पाठवू लागली. या अज्ञात व्यक्तीने किती कागदपत्रे पाठवावीत..? तब्बल ३८०० फाईल्स.
हे सगळे विश्लेशण करून नक्की काय झाले हे समजण्यासाठी अँकीने एका तज्ञाची मदत घेतली - लीरॉय थॉमसन. लीरॉय थॉमसन हा निवृत्त अमेरीकन आर्मी अधिकारी. ओलीस आणि अपहरण क्षेत्रातील तज्ञ.
निघालेले निष्कर्ष आणि परिस्थिती धक्कादायक होती..
(१) ऑलंपीक व्हिलेजची सुरक्षाव्यवस्था फक्त कागदावर मजबूत दिसत होती. प्रत्यक्षात सुरक्षाव्यवस्था अत्यंत ढिली व अकार्यक्षम होती. सहा सात फुटी कुंपणावरून कुणीही ये जा करू शकत होते. चेकपोस्ट व सिक्यूरीटी गार्ड्सचा कोणाताही वचक नव्हता.
(२) ओलीसांच्या सुटकेचा पहिला प्रयत्न ओलीस आणि अपहरणकर्ते अपार्टमेंटमध्ये असताना केला गेला. या प्रयत्नाच्यावेळी दहशतवाद्यांची नक्की संख्या, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे, शस्त्रांची क्षमता, दारूगोळा, दहशतवाद्यांचा नक्की ठावठिकाणा (कोणत्या खोलीमध्ये आहेत, एकत्र आहेत की विखूरलेले आहेत) इमारतीची रचना, नकाशे व प्लॅन. ओलीस जखमी आहेत की नाही याची वस्तुस्थिती, ओलीसांना कोणत्या अवस्थेत ठेवले आहे, कुठे ठेवले आहे. अशी अत्यंत महत्वाची माहिती नसताना आणि कोणत्याही रेस्क्यू प्लॅनशिवाय दहशतवाद्यांवर हल्ला करायला निघालेले हे पोलीस यशस्वी ठरले असते तर ते बहुदा मोठे आश्चर्य ठरले असते.
ट्रॅकसूटमध्ये रेस्क्यूसाठी निघालेल्या या टीमकडे फक्त सब मशिन गन होत्या. ही रेस्क्यू टीम ट्रॅकसूट मध्ये अवघडून वावरत होती. शस्त्रांच्या हाताळणीत सराईतपणा नव्हता आणि त्यांच्या हालचाली नवशिक्यासारख्या होत्या. हे सगळेजण कोणतेही कमांडो पथक किंवा स्पेशल युनीट वगैरे नव्हते. हे सगळे जण स्ट्रीट पोलीस / साधे पोलीस होते. ज्यांच्याकडे अशाप्रकारच्या परिस्थितीत काय करावे याचे विशेष ज्ञान आणि प्रशिक्षण नव्हते.

वरील फोटो निरखून बघितला तर लक्षात येते की हे पोलीस बंदुका नवशिक्यासारख्या हाताळत आहेत. बंदुकीची नळी स्वत:कडे करून देवाण घेवाण सुरू आहे. कोणत्याही परीस्थीतीत बंदूक हाताळताना किंवा बंदूक घेवून कोणतीही हालचाल करताना बंदुकीची नळी स्वत:कडे किंवा आपल्या सहकार्‍याकडे करायची नाही हा शस्त्रे हाताळायचा महत्वाचा संकेतही पाळला जात नव्हता (हा संकेत आपल्याकडे NCC पासून शिकवायला सुरू करतात व नियम म्हणून मनावर बिंबवला जातो) यावरून या रेस्क्यू टीमचे कौशल्य लक्षात यावे.
याही पुढची बाब म्हणजे रेस्क्यू प्लॅन रद्द झाल्यानंतर एक पोलीस अपहरणकर्त्यांच्या इमारतीवरून सिगरेट फुंकत खाली उतरला. यावरून रेस्क्यू दरम्यान ते किती गंभीर होते हेही लक्षात येते.
आणि हास्यास्पद बाब म्हणजे या सगळ्याचे "थेट प्रक्षेपण" सुरू होते. रेस्क्यू टीम च्या ठावठिकाण्यासहित...
(३) या घटनेदरम्यान बघ्यांची गर्दी वाढतच होती व ती नियंत्रणात आणण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत की ती गर्दी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. गर्दीमध्ये एकूण बघ्यांची संख्या होती तब्बल ७५ ते ८० हजार....!!!!
अपहरणकर्त्यांनी एखादा ग्रेनेड किंवा ऑटोमेटीक रायफलची एखादी फैर झाडली असती तर ओलीसांपेक्षा कित्येक पटीने जास्ती बळी गेले असते.
(४) अतीउत्साही मिडीया सर्कसला आवरण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.
(५) विमानतळावर घडलेल्या घटनांदरम्यान जर्मन पोलीसांनी केलेल्या चुका पाहिल्या तर या हत्याकांडाला जर्मनीचा पाठिंबा होता की काय असा प्रश्न पडतो...
(A) दहशतवाद्यांचा खरा आकडा अर्धा तास आधी कळून सुध्दा प्लॅनमध्ये कोणताही बदल केला गेला नाही.
विमानतळाभोवती असलेल्या ५ स्नायपर्स कडे बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट आणि रेडीयो नव्हते. या स्नायपर्स कडे स्नायपर गन नव्हत्या, ज्या साध्या गन होत्या त्याला दुर्बीणी नव्हत्या, नाईट व्हिजन नव्हते आणि हे स्नायपर्स सुध्दा स्ट्रीट पोलीस / साधे पोलीस होते, त्यांना स्नायपर शूटींगचे कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नव्हते. जर्मनीच्या नियमाप्रमाणे लष्कर अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू शकत नव्हते त्यामुळे स्नायपर बॅटलमध्ये दुसर्‍या महायुध्दात नावलौकीक मिळवणार्‍या जर्मनीने या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाच्या ठिकाणी साधे पोलीस नेमले.
(B) संपूर्ण हल्ल्यादरम्यान कंट्रोलरूम / लीडर, स्नायपर्स व विमानातले वेष बदललेले पोलीस यांच्यात कोणताही ताळमेळ नव्हता, कोणतेही संभाषण नव्हते.
(C) विमानातल्या पोलीस टीमने हेलीकॉप्टर लँड होण्याच्या केवळ अर्धा सेकंद आधी प्लॅनमध्ये बदल केला व 'इंधन भरलेल्या विमानात दहशतवाद्यांनी एका ग्रेनेडचा स्फोट केला तर कोणीच जिवंत राहणार नाही' या भीतीने ते पळून गेले. या बदलाची कोणालाही काहीही माहिती दिली गेली नाही. (यामुळे ८ दहशतवादी विरूध्द ५ स्नायपर्स अशी स्थिती तयार झाली.)
(D) ठरलेल्या प्लॅनप्रमाणे हेलीकॉप्टर्स कंट्रोल टॉवरकडे बाजूचे दरवाजे करून उतरणार होते जेणेकरून सर्व स्नायपर्स ना दहशतवाद्यांवर गोळ्या झाडणे सोपे गेले असते पण काही अनाकलनीय कारणामुळे दोन्ही हेलीकॉप्टर्स कंट्रोल टॉवरकडे तोंड करून उतरले. त्यामुळे स्नायपर्स ना दहशतवाद्यांचा वेध घेणे अवघड गेले. एक स्नायपर दहशतवाद्यांपासून केवळ ५० मीटर अंतरावर होता. पण चुकीच्या पध्दतीने लँड झालेल्या हेलीकॉप्टर मुळे तो कंट्रोल टॉवर वरच्या स्नायपर्सच्या थेट मारक्षेत्रात आला. सरळ त्याच्या दिशेने येणार्‍या त्याच्याच सहकार्‍यांच्या गोळ्यांमुळे जमिनीवरच्या स्नायपरला एकही गोळी झाडायची संधी मिळाली नाही. (५ स्नायपर्स पैकी एक निकामी - म्हणजे ८ दहशतवादी विरूध्द ४ स्नायपर्स)
(E) रात्री ११ च्या दरम्यान गोळीबार थांबल्यानंतर चिलखती गाड्या (APC) विमानतळावर येण्यासाठी तब्बल एक तास लागला. कारण? चिलखती गाड्या म्यूनीकमध्ये संरक्षणासाठी नेमल्या होत्या व जर्मन पोलीस या गाड्यांना बोलवायचे विसरले! (हो! विसरले!!!!!) लक्षात आल्यावर रेडीयोने संपर्क साधून या गाड्यांना अवताण धाडले गेले पण या गाडयांचा मार्ग मिडीया आणि बघ्या प्रेक्षकांनी व्यापलेला होता, जर्मन पोलीस हा मार्ग मोकळा करायचेही विसरले. म्यूनीकमधून विमानतळावर येण्यासाठी या गाड्यांना बरेच अडथळे पार करावे लागले व त्यात बराच वेळ वाया गेला.
(F) या गोळीबारादरम्यान स्नायपर्ससुध्दा अंदाधुंद गोळीबार करत होते. नेम धरून गोळ्या मारण्याचा प्रयत्न (Precision Shots) खूप कमीवेळा केला गेला.
(G) संपूर्ण रेस्क्यूप्लॅनवर, चालू घडामोडींवर कोणाचेही नियंत्रण नव्हते.
या सर्व चुकांची परीणीती ९ खेळाडूंच्या दुर्दैवी मॄत्यूत झाली.


ऑलंपीक खेळ चालू राहतील तोपर्यंत ही रक्तरंजीत घटना कुणीही विसरू शकणार नाही.
ऑलंपीकच्या पाच कड्यांपैकी एक रक्तवर्णी कडे कदाचित ही घटना विसरू देणार नाही.
************************************************************
या घटनेनंतर दीड महिन्यातच एका लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या बोईंगचे अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी Munich Massacre मधल्या तीन जिवंत दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली... आणि जर्मनीने ती मान्य करत तीनही दहशतवाद्यांना लगेचच सोडून दिले.
या बोईंगचे अपहरण हाही एक विवादास्पद मुद्दा आहे. या अजस्त्र विमानात त्यावेळी फक्त १२ प्रवासी होते, एकही स्त्री आणि लहान मूल नव्हते आणि Munich Massacre मधल्या तीन जिवंत दहशतवाद्यांना मुक्त करताना जर्मनीने इस्राईलला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही.
************************************************************
Munich Massacre ही घटना इथेच जरी संपली असली तरी इस्राईलने हे सगळे सहजासहजी संपवले नाही. म्यूनीकमधून जिवंत बाहेर पडलेल्या तीन पैकी दोन अपहरणकर्त्यांना ते लपलेल्या देशात, त्यांच्या ठिकाणी घुसून ठार मारले. यासोबत Munich Massacre "प्लॅन" करणारे डझनभर प्लॅनरही असेच ठार ‍मारले गेले.
(या मालिकेचा पुढील भाग - Operation Wrath of God)
************************************************************
सर्व फोटो आणि माहिती अंतर्जालावरून साभार.
************************************************************

ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण.

ऑलंपीक - अविस्मरणीय क्षण.
"ऑलंपीक" हा शब्द जरी उच्चारला किंवा कानावर आला की खालच्या घटना डोळ्यासमोरून स्लाईड शो प्रमाणे झरझर सरकू लागतात, काळ वेळ ठिकाण सर्व विसरून!!
१) डेरेक रेडमंड - १९९२ बार्सिलोना ऑलंपीक.
४०० मीटर धावण्याची सेमी फायनल सुरू झाली.. पूर्ण भरात असलेल्या डेरेक रेडमंड ने भन्नाट सुरूवात केली.. अर्धे अंतर पार केले न केले तोच त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला. होणार्‍या वेदनांमुळे रेडमंड ट्रॅकवरच कोसळला. बाकीचे स्पर्धक पुढे निघून गेलेच होते. ऑलंपीकचे स्वप्न भंगल्याचे दु:ख इतके तीव्रपणे जाणवले की रेडमंड हमसून हमसून रडू लागला. ट्रॅकवर जखमी रेडमंड भोवती मेडीक आणि इतर सपोर्ट्सचा गराडा पडला. त्यांची मदत नाकारून अचानक काहीतरी ठरवल्याप्रमाणे रेडमंड उठला.. लंगडत लंगडत पळू लागला..."रेस पूर्ण करायची" या उद्देशाने.
अचानक त्याच्या खांद्यावर एक हात जाणवला. ट्रॅकभोवती संरक्षणासाठी असलेल्या गार्डसोबत अक्षरश: भांडून, ढकलाढकली करून व त्यांना गुंगारा देवून डेरेक रेडमंडच्या मदतीसाठी एक माणूस आला होता. त्याचे वडील 'जिम रेडमंड'.
आपला मुलगा वेदनेने तळमळत आहे हे पाहून पुढचा कोणताही विचार न करता मदत करणार्‍या वडिलांचा आधार डेरेक ने घेतला व आता ट्रॅकवर दोघे पळू लागले.. "रेस पूर्ण करायची" या उद्देशाने.
आता गेम ऑफीशियल्स ट्रॅकवर आले व जिम रेडमंडशी वाद घालू लागले, ते वडीलच आहेत हे कळाल्यावर ऑफीशियल्स चा ही नाईलाज झाला. (हे सगळे सुरू असताना डेरेक आणि जिम हळूहळू धावतच होते... फिनीश लाईनकडे)
फिनिश लाईनच्या थोडे आधी डेरेकने वडीलांचा हात सोडला व रेस पूर्ण केली. ६५००० प्रेक्षक स्टँडींग ओवेशन देत असताना...
जरी ऑलंपीक रेकॉर्डमध्ये डेरेक या रेस मधून "ऑफिशीयली" बाद झाला असला आणि निकाल "Did Not Finish" असा असला तरी या कृतीने डेरेक ऑलंपीक इतिहासात जावून बसला. ही घटना इंटरनॅशनल ऑलंपीक कमिटीच्या 'Celebrate Humanity' videos' मध्ये दाखल झाली, डेरेकने रिटायरमेंट नंतर ऑलंपीक चळवळीसाठीही काम केले.
वडील जिम रेडमंड ना २०१२ लंडन ऑलंपीक टॉर्च "कॅरी" करण्याचा बहुमान मिळाला.
डेरेक व जिम रेडमंड बार्सिलोना ऑलंपीकमध्ये

२) अमेरीकन बास्केटबॉल टीम - १९७२ म्यूनीक ऑलंपीक
१९७२ साल, ऑलंपीकची गोल्ड मेडल मॅच, स्पर्धक कोण तर अमेरीका आणि रशिया. (साल आणि स्पर्धक यांच्याकडे विशेष लक्ष द्या!)
खेळ संपायला ३ सेकंद राहिले असताना.... ............. स्कोर -- रशिया ४९ - अमेरीका ४८
अमेरीकेने पुढच्या दोन सेकंदात दोन पॉईंट मिळवले .... स्कोर -- रशिया ४९ - अमेरीका ५०
खेळ संपायला १ सेकंद उरला होता.. आणि पुढे जे झाले ते कोडे कुणालाच कधीच सुटले नाही.
आत्तापर्यंतची सर्वाधीक वादग्रस्त ऑलंपीक मॅच.. या गेममध्ये इतके निर्णय बदलले गेले, इतके गोंधळ झाले की आजही कोणताही स्पष्ट निर्णय लागला नाहीये. फायनल मॅचमध्ये वादग्रस्त परिस्थितीत गोल्ड मेडल हरल्याचे अमेरीकन टीमच्या इतके जिव्हारी लागले की ४० वर्षांनंतरसुध्दा या मॅचचे सिल्व्हर मेडल्स त्यावेळच्या अमेरीकन बास्केटबॉल टीमने स्वीकारले नाहीयेत. अमेरीकन बास्केटबॉल व इंटरनॅशनल ऑलंपीक कमिटी (IOC) वगैरेनी बर्‍याच विनंत्या केल्या पण कांही खेळाडू आजही सिल्वर मेडल न स्वीकारण्यावर ठाम आहेत.
एका खेळाडूने तर त्याच्या मृत्यूपत्रात, बायकोने, मुलांनी व त्याच्या पुढच्या पिढ्यांनी "सिल्वर मेडल स्वीकारू नये" असे आदेश दिले आहेत.
या मॅचची अधिक माहिती -इथे
मराठीत वर्णन (मला तरी) शक्य नाही इतकी गुंतागुंत आहे शेवटच्या ३ सेकंदात!!
३) मुहम्मद अली.
ही घटना ऑलंपीकशी निगडीत आहे कोणत्याही ऑलंपीकदरम्यान घडलेली नाही.
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी "रोम ऑलिम्पिक" मध्ये "गोल्ड मेडल" चा बहुमान मिळवून अली ने करीयरची झकास सुरूवात केली. मायदेशी मात्र तो एक ऑलंपीक विजेता असला तरी पहिला एक "कलर्ड" होता व नंतर सुवर्णपदक विजेता.
एके दिवशी एका रेस्त्रॉ मध्ये गेले असताना त्याला अत्यंत हीन वागणूक मिळाली. वेट्रेसने बर्गर व सोडा देण्याचेही नाकारले... या घटनेने दुखावलेल्या अलीने स्व्तःच्या गळ्यात असलेले मेडल तोडून काढले व ओहायो नदीत भिरकावून दिले. (हो, त्यावेळी अली ते मेडल कायम गळ्यात घालून फिरत असे!)
या घटने बद्दल अली म्हणतो,

"I was young, black Cassius Marcellus Clay, who had won a gold medal for his country. I went to downtown Louisville to a five-and-dime store that had a soda fountain. I sat down at the counter to order a burger and soda pop. The waitress looked at me.... 'Sorry, we don't serve coloreds,' she said. I was furious. I went all the way to Italy to represent my country, won a gold medal, and now I come back to America and can't even get served at a five-and-dime store. I went to a bridge, tore the medal off my neck and threw it into the river. That gold medal didn't mean a thing to me if my black brothers and sisters were treated wrong in a country I was supposed to represent."

१९९६ च्या "अ‍ॅटलांटा ऑलंपीक" ची ज्योत पेटवण्याचा बहुमान अली ला मिळाला व याच स्पर्धेदरम्यान १९६० चे सुवर्णपदक एका खास कार्यक्रमात पुन्हा प्रदान केले गेले व ते अलीने आभारपूर्वक स्वीकारले.

४) नादिया... पर्फेक्ट १० वाली. (पूर्णविराम!!!)
___________________________________________________

Monday, 9 July 2012

आर्सेलर मित्तल मर्जर..

---२७ जानेवारी २००६ ---

बीप बीप... बीप बीप...

टोरांटो एअरपोर्टच्या टर्मिनल १ मध्ये 'आर्सेलर' या जगातल्या दोन नंबरच्या स्टील कंपनीच्या CEO चा; गाय डॉलेचा मोबाईल वाजला.
अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो गोंधळला. पाच तास पुढे.. लंडनहून तो फोन आला होता.

गाय डॉले : "येस..?"

पलीकडचा आवाज:
"गाय, धिस इस लक्ष्मी मित्तल. आय अ‍ॅम कॉलींग यू अ‍ॅज अ मॅटर ऑफ कर्टसी टू टेल यू दॅट, टूमॉरो;

मित्तल स्टील विल बी अनाऊन्सिंग अ‍ॅन ऑफर डिरेक्टली टू यूअर शेअरहोल्डर्स फॉर ऑल द शेअर्स ऑफ आर्सेलर"

क्लिक! (गाय डॉलेने कॉल कट केला.)

लक्ष्मी मित्तल: "आय कांट बीलीव्ह इट.. ही हंग अप ऑन मी.!!!"
(जगातल्या पाचव्या श्रीमंत व्यक्तीला, संभाषण सुरू असताना आपला फोन समोरच्याने बंद करणे हा अनुभव विरळाच असावा!)

आणि एका कॉर्पोरेट वॉर ला सुरूवात झाली...

एका बाजूला होती 'मित्तल स्टील'
लंडन मध्ये मुख्य कार्यालय असलेली जगातली एक नंबरची स्टील कंपनी. भारतीय मालक आणि मॅनेजमेंट टीम मध्ये बहुतांशी भारतीय लोक असल्यामुळे, भारतात एकही कारखाना नसतानाही भारतीयत्वाचा शिक्का बसलेली 'युरोपीयन कंपनी'
दुसरीकडे होती 'आर्सेलर'
लक्झंबर्ग मध्ये मुख्य कार्यालय असलेली जगातली दोन नंबरची स्टील कंपनी. लक्झंबर्ग मध्ये अधिकाधीक रोजगार निर्माण करणारी व अर्थकारणात महत्वाची भूमीका पार पाडणारी सरकारची आवडती कंपनी. लक्झंबर्ग सरकारचे बरेचसे आर्थीक निर्णय स्टील उद्योगावर आणि अपरिहार्यपणे आर्सेलरवर अवलंबून होते.
आर्सेलर मॅनेजमेंट टीम त्यावेळी 'डोफॅस्को' या कॅनडातील स्टील कंपनीला विकत घेण्याचे सोपस्कार पूर्ण करून घरी, लक्झंबर्गला निघाली होती. ही बातमी ऐकून त्यांच्यामध्ये खळबळ माजली.
मित्तल स्टील इतक्या लगेच आर्सेलर विकत घेण्याच्या मागे लागेल हे हे कुणालाच अपेक्षीत नव्हते. लक्ष्मी मित्तलची नजर एक दिवस आर्सेलरवर पडणार याचा सर्वांनाच अंदाज होता.. "पण आत्ता??" मित्तल स्टीलने या आधीचे मर्जर फक्त ३ महिन्यांपूर्वी युक्रेन मधील 'क्रायवोरीझ्स्टाल' बरोबर केले होते; ते ही भरभक्कम ४.८४ बिलीयन डॉलर्सचे. 'क्रायवोरीझ्स्टाल' च्या लिलावात आर्सेलरने कडवी लढत दिली होती पण बाजी मित्तल स्टील ने मारली होती. या मर्जरची हवा शांत होण्या आधीच मित्तल स्टीलची ही चाल सर्वस्वी अनपेक्षीत होती.
'मित्तल आर्सेलर' मर्जरची पाळेमुळे त्याच लिलावात रोवली गेली होती. २५ ऑक्टोबर २००५ ला.
युक्रेन सरकारने 'क्रायवोरीझ्स्टाल' ची राखीव किंमत २ बिलीयन डॉलर्स ठरवली असताना व अपेक्षीत किंमत ३ बिलीयन डॉलर्स असताना, मित्तल स्टीलला 'क्रायवोरीझ्स्टाल' विकत घेण्यासाठी तब्बल ४.८४ बिलीयन डॉलर्स मोजावे लागले होते, तेही ६० ते ६५ बोलींनंतर. 'आर्सेलर' आणि 'स्मार्ट ग्रूप' या दोन कंपन्यांनी लिलावा दरम्यान किंमत सतत वाढवत ठेवली होती.
जर आर्सेलर या लिलावात नसती तर 'क्रायवोरीझ्स्टाल' साठी कमीतकमी १ बिलीयन डॉलर्स कमी मोजावे लागले असते हे 'आदित्य मित्तल' च्या लगेचच लक्षात आले.
'आदित्य मित्तल' - लक्ष्मी मित्तलचा मुलगा. फक्त इतकीच ओळख नाही तर व्हार्टन बिझनेस स्कूल मध्ये शिक्षण घेवून, कांही महिने 'क्रेडीत स्वीस' या इन्व्हेस्टमेंट बँकींग फर्म मध्ये नोकरी. २००१ च्या मंदीनंतर मित्तल स्टील ने जगभर केलेल्या बेफाम घोडदौडी मागचा 'ब्रेन'.
केवळ १५ वर्षामध्ये ४७ कंपन्या अ‍ॅक्वायर करणार्‍या मित्तल स्टीलच्या अलीकडील घडामोडींमध्ये शांतपणे पण अत्यंत महत्त्वाची भूमीका बजावणारा मित्तल स्टील चा CFO आणि Head of M&A (Merger & Acquisition)
जगातल्या एक आणि दोन नंबरच्या स्टील कंपन्यांमधील वर्चस्वाच्या खेळात संपूर्ण जगभरचे मार्केट खूपच छोटी जागा ठरणार आणि याचे नुकसान या दोन्ही कंपन्यांनाच होणार याची जाणीव चाणाक्ष मित्तल पितापुत्रांना झाली. प्रचंड वेगाने वाढणार्‍या मित्तल स्टीलचा चढता आलेख तसाच चढता ठेवण्यासाठी हे दोघे प्रयत्नशील होते व सध्याच्या परिस्थीतीत आर्सेलरला आपल्यात सामावून घेणे हाच एकच पर्याय राहिला आहे यावर दोघांचे एकमत झाले.
त्याच आठवड्यात हालचाली सुरू झाल्या.. फ्रेंडली डीलचे प्रयत्न सुरू झाले. जर संपूर्ण मर्जर शक्य नसेल तर मार्केट, प्रॉडक्ट यांमध्ये कुठे एकत्र येणे शक्य आहे का याची चाचपणी मित्तल द्वयी करू लागली. लक्ष्मी मित्तल आणि गाय डॉले यांची एखादी 'मिटींग' होणे शक्य आहे का याची शक्यता आदित्य व टीम अजमावू लागले.
त्याच दरम्यान आदित्य मित्तलने आर्सेलर 'अभ्यासण्यास' सुरूवात केली. आर्सेलर चे मार्केट, फायनान्स, स्ट्रॅटेजीज व प्रोजेक्शन्स कसे आहे व त्याचा मित्तल स्टील ला कसा उपयोग होईल.. नवीन कंपनी तयार झाली तर स्टील उद्योगाच्या जागतीक नकाशावर काय काय बदल होतील असे बरेच पैलू या अभ्यासाला होते.
मित्तल एक ना एक दिवस आर्सेलर कडे रोख वळवणार याची भिती खुद्द आर्सेलर मध्ये सर्वांनाच होती. योग्य प्रत्युत्तर देण्याची तयारी त्यांनीही सुरू केली.
'प्रोजेक्ट टायगर' नावाच्या एक प्रोजेक्टची सुरूवात केली गेली. आर्सेलरची पुढील धोरणे लक्षात घेवून जगातील अत्यंत महत्त्वाच्या कंपन्या विकत घेणे, मार्केट शेअर वाढवत नेणे, कंपनीची बाजारातील किंमत वाढवणे, स्पर्धकांवर नजर ठेवून त्यानुसार आपल्या चाली ठरवणे या उद्देशाने 'प्रोजेक्ट टायगर' सुरू झाला. या सगळ्या मागचे 'टारगेट' होते 'मित्तल स्टील'.
कोणत्याही मार्गाने आर्सेलर ला मित्तल स्टील च्या हातात सापडू न देणे, मित्तल स्टीलची इत्यंभूत माहिती ठेवणे आणि पितापुत्र पुढे नक्की काय करणार याची सर्व माहिती मिळवणे यावर 'प्रोजेक्ट टायगर' ने लक्ष केंद्रीत केले होते.
लक्ष्मी मित्तल म्हणजे "द मून"व 'आदित्य' म्हणजे "अ‍ॅडम"अशी टोपणनावे वापरून हा प्रोजेक्ट अत्यंत गुप्तरीत्या सुरू होता. व आर्सेलर मॅनेजमेंट 'प्रोजेक्ट टायगर टीम' वर खूष होती.
युक्रेन मध्ये अपयशी ठरल्याचा बदला आर्सेलरने 'डोफॅस्को' या कॅनेडीयन कंपनीला अ‍ॅक्वायर करून घेतला आणि आपले स्थान आणखी पक्के केले.
फ्रेंडली बीड साठी लक्ष्मी मित्तल ने केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले. गाय डॉले शी मध्यस्तांद्वारे बोलणे करून पाहिले. प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न झाला, एकदा गाय डॉले व एका सहकार्‍याला मित्तलनी आपल्या प्रासादतुल्य घरी बोलावूनही बोलते करण्याचा प्रयत्न केला. काहीच निष्पन्न झाले नाही.
कंपनी स्ट्रक्चर, कल्चर वेगवेगळे आहे अशी कारणे देवून आर्सेलरकडून कोणत्याही संभाषणाला पूर्णविराम दिला जात होता.
वरवर सगळे शांत व सुरळीत वाटत होते पण ही वादळापूर्वीची शांतता ठरणार होती.
या परिस्थितीत अचानकपणे मित्तल स्टीलने आर्सेलर विरूध्द 'होस्टाईल बिड' ची घोषणा केली व सारा युरोप ढवळून निघाला...

२२.८ बिलीयन डॉलर्स. इतकी प्रचंड किंमत मोजायची तयारी दाखवून मित्तल नी आपले हेतू स्पष्ट केले. स्टील उद्योगाचा चेहरामोहरा बदलणार याची सर्वांना जाणीव झाली. पण सगळे इतके सोपे नव्हते; सोपे असणारही नव्हते, आणि याचीही सर्वांना कल्पना होती.
सगळ्यात मोठा अडसर होता आर्सेलर मॅनेजमेंटचा. फ्रेंडली डीलला नकार देणारी ही मॅनेजमेंट टीम 'होस्टाईल बीड' ला सर्वशक्तीनीशी; सर्व मार्गाने तोंड देणार हे उघड होते.
आर्सेलरचे घर - लक्झंबर्ग, फ्रान्स, बेल्जीयम, स्पेन आणि खुद्द लंडन मध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनाच हे अविश्वसनीय वाटत होते.
आर्सेलर, लेबर युनीयन्स, या सर्व देशातले मंत्री, लक्झंबर्गचे राष्ट्रपती, कॉम्पीटीशन कमीशनर्स सगळे जण एकत्र येवून मित्तल स्टीलच्या विरोधात उभे राहिले.
प्रत्येकाचे वेगवेगळे हितसंबंध गुंतले होते.
आर्सेलरला 'स्वत्व' जपायचे होते. मित्तल स्टील बरोबर मर्ज होवून आपली 'ओळख' पूर्णपणे मिटून द्यायची नव्हती.
लेबर युनीयन्स ना व प्लँट बंद होण्याची व कामगारांच्या नोकर्‍यांची चिंता होती.
लक्झंबर्ग, फ्रान्स, बेल्जीयम, स्पेन ला आर्सेलरने त्यांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीची व भविष्यकालीन धोरणांची काळजी होती.
कॉम्पीटीशन कमीशनर्स ना स्वच्छ व्यवहारांची आणि एकाधिकारशाहीची शंका होती.
लक्झंबर्गचे राष्ट्रपती व मंत्रीमंडळ नवीन कंपनीचे मुख्य कार्यालय लक्झंबर्ग बाहेर जावू नये याच्या विवंचनेत गुंतले होते.
या सगळ्यांमध्ये एकच समान दुवा होता की मित्तलना रोखायचे.
कोणत्याही देशाला, सरकारला, कुणा पदाधिकार्‍याला न कळवता अचानकपणे केलेली घोषणा पचवणे सर्वांनाच जड गेले. कारण..?
"युरोप मध्ये अशा गोष्टी या पध्दतीने केल्या जात नाहीत"
युरोपीयन कमीशन, देशांतर्गत सरकार, वाणिज्य मंत्री, कॉम्पीटीशन ऑथॉरीटीज यांना आधी संपूर्णपणे कल्पना देवून, विश्वासात घेवून भविष्यकालीन धोरणे / बदल वगैरे कळवून मगच पुढच्या हालचाली करायच्या ही सर्वमान्य पध्दत.
याला उघडपणे छेद देत मित्तलनी अत्यंत धाडसी पाऊल टाकले होते.
पांच वेगवेगळे देश, त्यांचे वेगवेगळे नियम, वेगवेगळे कायदे या सर्वांवर असणारा युरोपीय संघटनेचा अंकुश आणि या सर्वांचे डील बाबतचे प्रतिकूल मत याला तोंड द्यावे लागणार हे मित्तलना माहिती होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील ३०० तज्ञ लोक यासाठी अहोरात्र झटत होते. मित्तल स्टीलच्या बाजूने इन्व्हेस्टमेंट बँकर्स ची फौज उभी केली गेली होती.
अशीच फौज आर्सेलरने ही उभी केली.
मित्तल स्टीलच्या बाजूने,
Goldman Sachs
Credit Suisse
HSBC
Citi Group
Societe Generale
आर्सेलरच्या बाजूने
Merrill Lynch
Morgan Stanley
Deutsche Bank AG
BNP Paribhas SA and UBS AG.
तर लक्झंबर्गला सरकारचे सल्लागार होते, JP Morgan Chase and Co.
ही फक्त इन्व्हेस्टमेंट बँकर्स ची यादी. लॉ फर्म, PR फर्म, अकाऊंटन्ट्स, कम्युनीकेशन एक्स्पर्ट्स या व अशा अनेक टीम्स एकाच वेळी मैदानात उतरल्या होत्या.
जगभरातले Who's Who एकतर या डीलमध्ये या ना त्या कारणाने गुंतले होते नाहीतर खूप बारकाईने लक्ष ठेवून होते.
(अवांतर - या डीलनंतर वरील सगळ्या फर्म्सना मिळालेली अ‍ॅडवायझरी फी होती तब्बल ३०० मिलीयन डॉलर्स)
पुढे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.
कोणतीही चर्चा न करता, डील मधले मुद्दे विचारान न घेता आर्सेलर मॅनेजमेंटने तिसर्‍याच दिवशी मित्तल स्टीलची ऑफर नाकारली.
पुढचे पांच महिने मित्तल पितापुत्र वेगवेगळ्या देशांना भेटी देत होते. राज्यकर्ते, मंत्री, युरोपीयन कमीशनचे अधिकारी, देशांतर्गत सरकारचे पदाधिकारी, कॉम्पीटीशन कमीशनर्स, शेअरहोल्डर्स ना भेटत होते. ऑफर मागची कल्पना. स्टील उद्योगाचे भवितव्य. जागतीक स्टील उद्योगातील युरोपचे स्थान, महत्त्व अशा गोष्टी पटवून दिल्या जात होत्या.
या पांच महिन्यांच्या दरम्यान मित्तल पितापुत्रांनी ७५० तासांपेक्षाही जास्त विमान प्रवास केला (साधारणपणे २५ वेळा जगप्रदक्षिणा होईल इतके) बाकीच्या लोकांसाठी मित्तल स्टीलने जेट विमाने भाड्याने घेतली होती.
या दरम्यान आर्सेलर CEO गाय डॉले वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहिला..
मित्तल स्टीलला "कंपनी ऑफ इंडीयन्स",
मित्तल स्टीलने कमावलेल्या पैशाला 'monnaie de singe' म्हणजेच 'monkey money'
लक्ष्मी मित्तलना 'खोटे बोलणारा / खरे लपवणारा माणूस'
आर्सेलर म्हणजे 'खरे अत्तर' आणि मित्तल स्टील म्हणजे 'यु-डी-कलोन'
अशी विशेषणे वापरून स्वत:साठी आणि स्वत:च्या कंपनीसाठी परिस्थीती आणखी बिकट करून घेतली.
१९ मे २००६ ला मित्तलनी आपली ऑफर ३४ % ने वाढवली. कंपनी स्ट्रक्चर बदलायचे मान्य केले व नवीन कंपनी मधला फॅमीली स्टेक ५०% च्या खाली न्यायचीही तयारी ठेवली.
लक्ष्मी मित्तल चर्चेसाठी अजूनही वाट बघत होते. त्यांच्या प्रयत्नांना आर्सेलर मधून कोणीच दाद देत नव्हते.
दरम्यान आर्सेलरने एक व्हाईट नाईट शोधून काढला. "सेव्हरस्टाल" रशीयन स्टील कंपनी.
२६ मे २००६ ला आर्सेलरने "सेव्हरस्टाल" बरोबर मर्जर ची घोषणा केली.
मित्तल स्टील साठी हा मोठा धक्का होता. इतके सारे प्रयत्न वाया गेल्यामुळे सगळेच जण सुन्न झाले. मित्तल स्टील ला पुढे अंधार दिसत होता.
चार महिने सर्व शक्तीनीशी लढलेल्या लढाईत त्यांच्या समोर दुसरेच कोणीतरी जिंकत होते...
स्वतः लक्ष्मी मित्तल, आदित्य, या डील वर काम करणारा 'कोअर ग्रूप', विविध क्षेत्रातले सल्लागार आणि तज्ञ सगळेच जण निराश झाले. नक्की कोणत्या गोष्टीमुळे अचानक सगळ्या गोष्टी बदलल्या याचा विचार सुरू झाला. या डीलसाठी वेगवेगळ्या कामात गुंतलेले व देशोदेशी विखुरलेले सगळे मॅनेजर्स एकत्र आले आणि अत्यंत वाईट मनस्थितीत मीटींग सुरू झाली..
आर्सेलरमध्येही त्याच वेळी एक भव्य मीटींग सुरू झाली. 'सेव्हरस्टाल' चा सर्वेसर्वा अलेक्सी मॉरडॅशॉव पहिल्यांदाच आर्सेलर च्या मीटींगमध्ये सहभागी होत होता. आर्सेलर मॅनेजमेंट सगळ्यांना धन्यवाद देत होते, आभार मानत होते. आपले अस्तीत्व जपल्याच्या, स्वत:चे नाव शाबूत ठेवल्याच्या आणि एक होस्टाईल बीड परतावून लावल्याच्या आनंदात सर्वजण मश्गूल झाले होते. स्वतःची पाठ थोपटून घेण्याची स्पर्धा सुरू झाली.
'आर्सेलर सेव्हरस्टाल' फ्रेंडली मर्जर ची इत्यंभूत माहिती मिळताच मित्तल स्टील आणि शेअरहोल्डर्स हादरून गेले. मित्तल स्टीलने दिलेली ऑफर सर्वच पातळ्यांवर सेव्हरस्टाल पेक्षा वरचढ होती तरीही आर्सेलरने सेव्हरस्टाल बरोबर हात मिळवावेत हे कुणालाच पटले नव्हते.
सेव्हरस्टाल बरोबरची डील आर्सेलरला कधीही फायदेशीर ठरणार नव्हती.
मित्तल आणि टीम याच क्षणाची वाट बघत होते.
इन्व्हेस्ट्मेंट बँकर्स, कम्युनीकेशन टीम, PR टीम सगळे जण कामाला लागले.
'सेव्हरस्टाल आर्सेलर' डील आणि 'मित्तल आर्सेलर' डील मधला फरक, त्याचे स्टील उद्योग आणि युरोपीयन मार्केटवर होणारे दूरगामी परीणाम सगळीकडे झळकू लागले. आर्सेलरच्या इन्व्हेस्टर्स आणि शेअरहोल्डर्सचे फोन खणखणू लागले, मोबाईल गुणगुणू लागले आणि मेलबॉक्स भरून वाहू लागले. संपर्काचे एकही साधन शिल्लक न ठेवता मित्तल स्टीलचे वेगवेगळे टीम मेंबर्स बेगुमानपणे व अत्यंत सावधपणे हे सगळे जिथे शक्य होईल त्या त्या ठिकाणी मांडत होते. मित्तल स्टीलच्या बाजूने शेअरहोल्डर्सचे पारडे झुकू लागले.
ज्यांचे आर्सेलरमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत अशा काही खास शेअरहोल्डर्सना लक्ष्मी मित्तल स्वत: भेटून परिस्थीती विषद करत होते व त्यांचे मत मित्तल स्टीलच्या बाजूने वळवून घेत होते.
केवळ ४ ते ५ दिवसातच आर्सेलरच्या ३० % ते ३५ % शेअरहोल्डर्सना आपल्याकडे वळवून घेण्यात मित्तल स्टील यशस्वी झाले आणि आर्सेलर मॅनेजमेंट च्या पायाखालची जमीन सरकू लागली.
या सर्व घडामोडींवर युरोपीयन कमीशनर्स व रेग्यूलेटर्स खूप बारकाईने लक्ष ठेवून होते. विविध उद्योगांमध्ये युरोपचे रशीयावर असलेले अवलंबीत्व त्यांच्या चिंतेचा विषय होता. त्यात स्टील उद्योगाची भर पडू देणे युरोपीयन उद्योगांना परवडणारे नव्हते.
यादरम्यान मित्तल स्टीलच्या ऑफरला युरोपीयन कमीशनर्सनी हिरवा झेंडा दाखवला आणि मित्तल टीमचे मनोधैर्य आणखी उंचावले.
या परिस्थीतीत शेवटचा वार केला भारतीय सरकारने.
फेब्रुवारी २००६ मध्ये ज्यावेळी फ्रेंच राष्ट्रपती जॅक शिराक भारतभेटीवर आले होते त्यावेळी मित्तलनी होस्टाईल बीड ची घोषणा करून जवळ जवळ महिना होत आला होता. 'भारतीयत्वाच्या' मुद्द्यावरून युरोपीयन देशांचा या डीलला असलेल्या विरोध आणि पक्षपातीपणा विरूध्द भारतीय पंतप्रधान आणि मंत्रीमंडळाने निषेध नोंदवला होता..
तोच धागा पकडून भारताच्या वाणिज्य मंत्र्यांनी (कमल नाथ) 'सेव्हरस्टाल आर्सेलर' डील वर आणि त्यावर असलेली युरोपीयन देशांची दुटप्पी भूमीका यावर कडक शब्दात ताशेरे ओढले, वर्णभेदाचा निषेध म्हणून अप्रत्यक्षपणे "कॉमर्स वॉर" ची घोषणा केली.
तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून आर्सेलर मॅनेजमेंटने आपले मत रेटून नेत 'सेव्हरस्टाल आर्सेलर' डील वर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला.
आर्सेलरचे शेअरहोल्डर्स, कामगार संघटना, इन्व्हेस्टर्स (ज्यामध्ये व्यक्तींबरोबर कांही देशांचाही समावेश होता) आणि ते सर्व देश ज्यांचा आर्सेलरच्या डोक्यावर हात होता त्यांना हा निर्णय पटणे शक्यच नव्हते.
'शेअरहोल्डर्स चे हित जपले जात नाहीये' या कारणाने शेअरहोल्डर्सच्या प्रतिनिधींनी आर्सेलर मॅनेजमेंटला खडसावले.
युरोपीयन कमीशन ने या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आणि आर्सेलरवर बरेच निर्बंध लादले.
कामगार संघटनाही मित्तल स्टीलच्या बाजूने उभ्या राहिल्या.
या दरम्यान झालेल्या एका ' आर्सेलर शेअरहोल्डर्स मीट' मध्ये विक्रमी संख्येने शेअरहोल्डर्स उपस्थीत राहिले व 'सेव्हरस्टाल आर्सेलर' डीलच्या विरोधात मतदान करून मित्तल स्टीलचे पारडे आणखी जड केले.
परिस्थितीची अचूक जाण असलेल्या लक्ष्मी मित्तनी आपली ऑफर आणखी वाढवली व ३३.७ बिलीयन डॉलर्स पर्यंत नेवून ठेवली (त्यावेळचे १,५२,००० कोटी रूपये). कंपनीतला मित्तल कुटूंबाचा हिस्सा ४५%च्या खाली घेतला आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची संख्या १८ पर्यंत वाढवून त्यापैकी फक्त ६ जागा स्वतःकडे ठेवल्या.
या ऑफरला नकार देण्यासाठी आर्सेलर मॅनजमेंटला कारण सापडणे शक्यच नव्हते.
मित्तल स्टीलकडून सतत पाच महिने अव्याहतपणे काम करणार्‍या ३०० लोकांच्या टीमच्या प्रयत्नांना यश आले व २५ जून २००६ ला जगातली पहिल्या १००+ मिलीयन टन उत्पादन करणार्‍या "आर्सेलर मित्तल " ची घोषणा झाली.
जगातली सर्वात मोठी स्टील कंपनी.. जागतीक स्टील उत्पादनात व १०% वाटा असणारी 'आर्सेलरमित्तल' दुसर्‍या क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तिपटीने मोठी होती यावरून या कंपनीचा अवाका लक्षात यावा.
विजयी क्षण.

लक्ष्मी मित्तल - जोसेफ किंच (आर्सेलर चेअरमन) - आदित्य मित्तल
विजयी हास्य

सद्यस्थिती -
२००८ च्या मंदीमुळे आर्सेलरमित्तलचे उत्पादन प्रचंड प्रमाणात कमी झाले पण २००९ नंतर मार्केटबरोबर तेही सावरत आहे.
स्टील उत्पादन - मिलीयन टन मध्ये
२००७ - ११६.४ MT
२००८ - १०३.३ MT
२००९ - ७७.५ MT
२०१० - ९८.२ MT
२०११ - ९७.२ MT
२०११फॅक्ट फाईल
Revenue..............-....US$ 93.973 Billion
Operating Income....-....US$ 04.898 Billion
Profit..................-....US$ 02.263 Billion
Total Assets..........-....US$ 121.88 billion
Total Equity..........-....US$ 56.690 billion
Employees...........-....261,000
'आर्सेलरमित्तल' ला जोरदार पर्याय उभा करण्यात चीन यशस्वी झाला आहे. जगातल्या ३० मोठ्या स्टील कंपन्यांच्या यादीत चीनच्या १० कंपन्या असून त्यांचे एकत्रीत उत्पादन ३०० मिलीयन टन च्या जवळपास आहे.
३० जून २०१० ला युरोपीयन कमीशन ने १७ स्टील कंपन्याना "Price Fixing Scandal" साठी ५१८ मिलीयन युरो इतका प्रचंड दंड ठोठावला. इथेही 'आर्सेलरमित्तल' आघाडीवर होते, 'आर्सेलरमित्तल' ला सर्वात जास्त दंड सहन करावा लागला. Smile
भारतीय स्टील उद्योगातील 'आर्सेलरमित्तल'चा सहभाग हा एक वादग्रस्त विषय आहे, बरेच मोठे प्रकल्प, बरीच वर्षे लालफितीत अडकले आहेत - पण ती चर्चा इथे नको.
*************** संदर्भ ***************
विकीपीडीया
इंटरनॅशनल स्टील स्टॅटिस्टीक ब्यूरो
२००६ च्या दरम्यान प्रसिध्द झालेली व जालावर उपलब्ध असलेली वर्तमानपत्रे
http://strat.in
कोल्ड स्टील च्या संदर्भाने मिळालेली माहिती आणि जालावरची असंख्य पाने.
**********************************

Saturday, 30 June 2012

Near Death Experience.. अनुभवलाय कधी..?

शनिवार, २७ मार्च २०१०, कोर्टयार्ड मॅरीयॉट, हिंजवडी.

प्रत्येक महिन्यातून (पूर्ण) दोन दिवस होणारी क्लायंट मिटींग नेहमीपणे सकाळी सुरू झाली. मागच्या महिन्याचा प्रोजेक्ट परफॉमन्स, रीजनल परफॉमन्स, पुढची टारगेट्स वगैरे नेहमीचे विषय रवंथ करत करत एकदाचे रात्रीचे आठ वाजले व मिटींग संपली.

कॉकटेल / मॉकटेल प्रकार सुरू झाले.. रंगलेल्या गप्पा ऐकत शांतपणे एखाद्या मॉकटेलचा आस्वाद घेण्यातला आनंद वेगळाच!

अचानक टूम निघाली, ई स्क्वेयरला रात्री ११:३० च्या शो ला जायचे, बहुदा Terminator Salvation असावा.
हो नाही करत ६ जण तयार झाले, एका उत्साही मॅनेजरने लगेच बहुतेक फोनवरूनच बुकींग केले व आम्ही गडबडीने जेवणाकडे मोर्चा वळवला.

जेवण आवरतानाच कसे जायचे व कुणाच्या गाड्या घ्यायच्या वगैरे बोलणे झाले. निष्कर्ष काय निघाला तर सहा जणांसाठी चार चारचाकी पळवायच्या.. माझी दुचाकी वेगळीच.

रूमजवळच सोयीच्या ठिकाणी माझी गाडी पार्क करून मी एका कारमध्ये बसलो.

आम्ही ५० / ६० च्या वेगाने चाललो होतो, पस्तीशीचा कलीग कार व्यवस्थीत चालवत होता. एका वळणावर अचानक काहीतरी चुकले आणि क्षणार्धात आम्ही समोरून वाहने येणार्‍या लेनमध्ये आलो..
सावरायचा वेळ मिळालाच नाही. टाटाची मोठ्ठी बस समोरूनच येत होती.. उलट्या दिशेने.. आमच्या इतक्याच वेगात.

पुढचा क्षण अन् क्षण लख्ख आठवतो. पहिले दिसले दोन प्रखर हेडलाईट, रेडीएटर समोरची जा़ळी, ब्रेकचा कचकचाट, शेजारून कानावर आलेला फ* आणि मो S S S ठ्ठा आवाज.

Head On क्रॅश.

कारच्या सर्व संरक्षण उपकरणांनी वेळेवर व व्यवस्थीत काम करून आम्हाला ओरखडाही पडून दिला नव्हता. आम्ही ठणठणीत होतो. खाली उतरून आणखी एकदा खात्री करून घेतली. गाडीचे बरेच नुकसान झाले होते पण एका बाजूने धडक झाल्याने गाडी सुरू होत होती व गुरगुरत पुढे जावू शकत होती.

बसवाला पळून गेला होता, पोलीस, पंचनामा वगैरे कटकट नको म्हणून आम्हीही गाडी जवळच एका सुरक्षीत ठिकाणी लावली, माझ्या दुचाकीपर्यंत पायपीट केली व तिथून साडेअकराचा शो गाठला.

आजही गाडीचा वेग वाढवताना ते दोन प्रखर हेडलाईट आठवतात.

Thursday, 31 May 2012

Dyatlov Pass - एक जीवघेणे गूढ...

Dyatlov Pass - एक जीवघेणे गूढ.

ही घटना आहे अत्यंत अनाकलनीय परिस्थीतीची, चक्रावून टाकणार्‍या प्रसंगांची, नऊ स्की ट्रेकर्स च्या भयाण मृत्यूची आणि ५३ वर्षांनंतरही न सुटलेल्या जीवघेण्या कोड्याची...
१ फेब्रूवारी १९५९ च्या रात्री रशियातल्या उरल पर्वतावर नक्की काय घडले ते आजपर्यंत गूढच आहे. तिथे मिळालेले पुरावे, त्यांवरून बांधलेले परिस्थीतीचे अंदाज आणि त्या निष्णात ट्रेकर्सनी त्या वेळी घेतलेले निर्णय हे गूढ आणखी वाढवतात.
उरल पॉलीटेक्नीक इन्स्टीट्यूट चे दहा अनुभवी क्रॉस कंट्री स्की ट्रेकर्स (तीन मुलींसह) २५ जानेवारी १९५९ ला रशियातील Ivdel शहरात पोहोचले. या मोहीमेमध्ये हे सर्व जण 'ग्रेड ३' या प्रकारच्या अत्यंत कठीण हवामानातून ट्रेक करत उत्तर उरल पर्वातामधून Vizhai व नंतर Otorten येथे पोहोचणार होते.
हे या मोहीमेतले सहभागी ट्रेकर..
Igor Dyatlov (गृप लीडर)
Yuri Krivonischenko
Yuri Doroshenko
Rustem Slobodin
Zinaida Kolmogorova
Nicolai Thibeaux-Brignolle
Lyudmila Dubinina
Alexander Zolotarev
Alexander Kolevatov
Yuri Yudin
दोनच दिवसानंतर Yuri Yudin आजारी पडली व तिला परतावे लागले.



Lyudmila बरोबर हसून निरोप घेणारी Yuri, शेजारी Dyatlov.
आता नऊ जणांची ही टीम बर्फाळ वातावरणात मार्गक्रमण करू लागली..


ट्रेकदरम्यानची दंगा मस्ती.

१२ फेब्रुवारी पर्यंत Vizhai या ठिकाणी पोहोचून गृप लीडर Dyatlov स्पोर्ट्स क्लबला टेलीग्राम पाठवणार असे आधीच ठरले होते. ही तारीख निघून गेली तरी कोणी फारसे गंभीर झाले नाही, अशा प्रकारच्या मोहीमेत काही दिवसांचा उशीर ही नित्याचीच बाब असते. निसर्गाचा लहरीपणा आणि त्यापुढे मानवाची हतबलता.
आणखी काही दिवसांनंतर नातेवाईकांनी मदत पथक पाठवून उशीर का झाला आणि हे सगळेजण नक्की कुठे आहेत आहे हे शोधण्याची मागणी केली. पहिले मदत पथक फक्त काही शिक्षक व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे होते, नंतर (बहुदा या घटनेमागचा गंभीरपणा लक्षात आल्यानंतर) विमाने आणि हेलीकॉप्टर सह पोलीस व आर्मी सहभागी झाले.
अथक प्रयत्नांनंतर २६ फेब्रुवारीला शोधपथकला कँपसाईट सापडली, ट्रेकर्सचा तंबू विदीर्ण अवस्थेत सापडला.


तंबूपासून ५०० मीटर अंतरापर्यंत पाऊलखुणा दिसत होत्या, पाऊलखुणांच्या आधारे एका मोठया पाईन वृक्षाजवळ शोधल्यानंतर तिथे जळालेली लाकडे सापडली आणि जवळच दोन मृतदेह मिळाले. Yuri Krivonischenko आणि Yuri Doroshenko. दोन्ही मृतदेहांवर फक्त हाफ पँट (Underclothes) होत्या आणि दोघांचेही बूट गायब होते.
तिथून तंबूच्या दिशेने ३०० मीटर अंतरावर गृप लीडर Igor Dyatlov मृतावस्थेत सापडला.
Igor Dyatlov पासून तंबूच्या दिशेने १८० मीटर अंतरावर Rustem Slobodin तर तिथून आणखी पुढे १५० मीटर अंतरावर Zinaida Kolmogorov चे अवशेष सापडले.
हे पाचही जण कडाक्याच्या थंडीमुळे गोठून मरण पावलेले होते. Rustem Slobodin ची कवटी फ्रॅक्चर झाली होती, मात्र मृत्यू गोठल्यामुळेच आला होता.
यानंतर बाकीचे मृतदेह सापडले ४ मे १९५९ ला, तब्बल ६७ दिवसांनी. एका ४ मीटर खोल घळईमध्ये, त्या पाईन वृक्षापासून कँपसाईटच्या अगदी विरूध्द दिशेने...
या चारहीजणांना मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि भयाण पध्दतीने आला होता.
Nicolai Thibeaux-Brignolle - कवटीचा चक्काचूर झाल्याने व कडाक्याच्या थंडीने मृत्यू.
Lyudmila Dubinina - बरगड्या मोडल्याने व त्यातील कांही बरगड्या हृदयामध्ये शिरून अतीजास्त अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू. या २१ वर्षीय मुलीची जीभ, डोळे, वरच्या ओठाचे मांस आणि जबड्याचा आतला काही भाग गायब होता, हिच्या पायांभोवती Yuri Krivonischenko ची पँट गुंडाळलेली होती (ज्याचा मृतदेह सगळ्यात पहिला सापडला त्याची पँट) तसेच कपड्यांवर किरणोत्साराचे पुरावे सापडले.
Alexander Zolotarev - याचेही डोळे गायब होते बरगड्या मोडल्याने व कडाक्याच्या थंडीने गोठून मृत्यू. याच्या अंगावर Lyudmila चा कोट व हॅट सापडली तसेच याच्याही कपड्यांवर किरणोत्साराचे पुरावे सापडले. (याच्या आणि Lyudmila च्या जखमा सारख्या असल्या तरी त्यांचे स्वरूप खूप वेगळे होते, एकाच घटनेमुळे; उदा. घळईत पडणे. या जखमा झालेल्या नव्हत्या)
Alexander Kolevatov - फ्रॅक्चर झालेली मान, बाकी कोणत्याही मोठ्या जखमा नाहीत, कडाक्याच्या थंडीने गोठून मृत्यू.
सर्वात गूढ प्रकार म्हणजे, कांही मृतांचे केस विचित्र करड्या रंगाचे झाले होते, त्वचेचा रंग लालसर झाला होता आणि कांही जण शेवटी शेवटी दृष्टीहीन झाले होते.
हे सगळे पाहून चक्रावून गेलेल्या शोधपथकाने शक्य तितके पुरावे गोळा केले. त्यावरून निघालेले निष्कर्ष पुढील प्रमाणे.
१) रात्री ०९:३० च्या दरम्यान कोणत्यातरी अज्ञात कारणाने घाबरलेले सर्वजण अत्यंत घाईगडबडीत तंबू आतून फाडून बाहेर पडले व जंगलात पळाले. तंबूची दारे सोडवण्याइतका वेळ त्यांच्याकडे नव्हता.

जंगलात पळण्याचा मार्ग लाल रेषेत (२००४ साली घेतलेल्या फोटोवर १९५९ चा फोटो चिकटवलेला आहे)
तंबूची अवस्था - बर्फातून बाहेर काढल्यानंतरची.

२) तंबूच्या आत तयार केलेल्या कृत्रीम उष्णतेमुळे, एकतर कांहीजण कमी कपड्यात झोपायच्या तयारीत होते अथवा कपडे बदलत असताना कांहीतरी घडल्यामुळे पाईन वृक्षाचा आश्रय घेताना बरेच जण पूर्ण कपड्यांमध्ये नव्हते, बाहेरचे वातावरण पाहता आपण अशा हवेत (-25C ते -30C) फार काळ जगू शकणार नाही याची सर्वांना जाणीव होती, तरीही बूट, गरम कपडे व छोट्या सुर्‍याही बरोबर घेतल्या गेल्या नाहीत.
३) सर्वजण आपापल्या पायांवर चालत / पळत तंबूपासून निघाले, शरीरावरील सर्व जखमा तंबू सोडल्यानंतर झाल्या होत्या.
४) तंबू सोडल्यानंतर विस्कळीत झालेले हे सर्वजण ३०० / ४०० मीटर अंतरावर एकत्र आले, सर्वजण पाईन वृक्षाजवळ लपून राहिले नंतर त्यांनी लाकडे पेटवून उष्णता निर्माण करायचा प्रयत्न केला.
५) एक दोघांनी पाईन वृक्षावर चढून तंबूजवळ काय चालले आहे याचे निरीक्षण केले, झाडाच्या फांद्यांवर मानवी त्वचेचे पुरावे सापडले.
६) या सगळ्या घटनेदरम्यान सर्वजण मानसीक व शारिरीक दृष्ट्या व्यवस्थीत होते. लाकडे जाळून उष्णता तयार करणे, झाडावर चढून टेहळणी करणे, कमी कपडे घातलेल्या साथीदारांसाठी उपलब्ध कपड्यांची देवाण घेवाण करणे अथवा आपल्या मृत साथीदारांच्या कपड्यांच्या सहाय्याने थंडीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणे ही कांही उदाहरणे. यांवरून दृष्टीभ्रम, बुध्दीभ्रम या शक्यता निकालात निघतात.
७) Igor Dyatlov, Rustem Slobodin आणि Zinaida Kolmogorov हे तंबूत परत जाण्याच्या प्रयत्नात टप्प्याटप्याने गोठून मरण पावले.
८) Yuri Krivonischenko आणि Yuri Doroshenko यांचा कडाक्याच्या थंडीत गोठून मृत्यू झाला. यांचा मृत्यू झाल्याने वरील तिघांनी गरजेच्या वस्तूंसाठी तंबूकडे जाण्याचे ठरवले की तिघांची वाट पाहताना या दोघांचा मृत्यू झाला हे अस्पष्ट आहे.
९) वरील तिघेजण परत येत नाहीत याची खात्री पटल्यानंतर व दोन साथीदार मरण पावल्यानंतर, इतर चार जणांनी आपल्या मृत सहकार्‍यांच्या अंगावरील कपडे स्वत:साठी घेतले व मदत शोधण्यासाठी विरूध्द दिशेने जाण्यास सुरूवात केली.
१०) थोड्याच अंतरावर यां सर्वांनी स्वतःसाठी बर्फात एक जागा तयार केली व त्या घळईत उतरले, या जागेच्या तळात शरीराचा बर्फाशी संपर्क टाळण्यासाठी पाईन वृक्षाची लाकडे ठेवलेली आढळली.
११) या घळईत उतरताना / आणखी एखाद्या खोल घळईत उतरताना (बहुदा अपघात होवून) Nicolai मरण पावला, Dubinina चा ही अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला, तिचा कोट आणि हॅट Zolotarev ने घेतले, थोड्याच वेळात त्याचाही जखमांमुळे व गोठल्यामुळे मृत्यू झाला.
१२) एकटा पडलेला,घाबरलेला व प्रचंड थंडीत गारठलेला Alexander Kolevatov दमून झोपी गेला - पुन्हा कधीही न उठण्यासाठी.
(मृतदेहांचे फोटो जालावर उपलब्ध आहेत पण अत्यंत वाईट अवस्थेत असल्याने इथे देत नाही)
कांही अनुत्तरीत प्रश्न (मिपाकरांनी उत्तरे शोधली तरी हरकत नाही.)
१) मृतांचे केस विचित्र करड्या रंगाचे होणे, त्वचेचा रंग लालसर होणे आणि कांही जण शेवटी शेवटी दृष्टीहीन झाले याचे कारण काय असावे..? (कोणी शास्त्रज्ञ मदत करू शकेल काय..)
२) तंबूत परत येण्याच्या प्रयत्नात टप्प्याटप्याने मरण पावलेल्या तिघांचे शव हिमवृष्टीमुळे झाकले गेलेले होते, मात्र त्याच पठारावर त्यांच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसत होत्या, हे कसे शक्य आहे..?
३) Lyudmila Dubinina च्या चेहर्‍याची अमानवीय अवस्था (जीभ, डोळे, वरच्या ओठांचे मांस आणि जबड्याचा आतला काही भाग गायब होणे) कशामुळे झाली असावी..? तसेच तिच्या पोस्टमॉर्टम मध्ये घशातल्या स्नायूंबद्दल काहीच का लिहिले नाहीये..?
४) फक्त ४ मीटर खोल कोसळयाने इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा होणे शक्य आहे का..?
५) कवटी आणि बरगड्यांचे फ्रॅक्चर्स हे कोणत्याही मानवी ताकतीपेक्षा जास्त दबावामुळे झाले, तो दबाव नक्की कशाचा असावा..?
६) तिथल्या आदिवासी लोकांचा या सर्वांमध्ये कांही हात आहे का..?
७) शोधपथकाला तिथे अन्य कोणत्याही मानवी / प्राण्यांच्या वावराचे पुरावे सापडले नाहीत तरीही तिथे या टीमच्या नसलेल्या कांही वस्तू सापडल्या, हे कशामुळे..?
८) Kolevatov ची नाहीशी झालेली डायरी व एक कॅमेरा शोधपथकाला सापडले होते का..? असल्यास ते कुठे आहे..?
९) त्या पर्वतावर दुरून कांही जणांनी विचित्र लालसर प्रकाश पाहिला, त्या प्रकाशाचा आणि लालसर त्वचेचा कांही संबंध आहे का..?
१०) किरणोत्साराचे अंश कोठून आले..?
तिथे मिळालेले पुरावे व त्यावरून निघालेले निष्कर्ष शोधतपासाच्या दृष्टीने अत्यंत वेगवेगळे दिशा दाखवतात, नक्की काय झाले हे गूढच आहे अजून.
रशीयातील Yekaterinburg येथे 'उरल स्टेट टेक्नीकल युनीव्हर्सीटी' च्या मदतीने Dyatlov Foundation स्थापन झाले आहे, फाऊंडेशनने दुर्दैवी ट्रेकर्सच्या आठवणी म्युझीयम मध्ये जतन केलेल्या आहेत व सरकारकडे जुन्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी पाठपुरावा करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
मेमोरीयल.

If I had a chance to ask God just one question, it would be,"What really happened to my friends that night?"Yuri Yudin च्या या प्रश्नामधील आक्रोश आजही अनुत्तरीतच आहे. Sad
शक्य झाले तर "पार्ट २ - कॉन्स्पीरसी थिअरीज" नाहीतर इथेच शेवट.
***डिस्क्लेमर्स***
ट्रेकर्सची नावे मुद्दाम इंग्रजीत लिहिली आहेत - अजाणतेपणेही मृतांच्या नावाचा चुकीचा उच्चार होवू नये म्हणून.
हे कोडे ५३ वर्षांनंतर आजही अनुत्तरीत आहे. नक्की काय झाले असावे याचा अंदाज बाधून कोणाला चर्चा करायची असल्यास स्वागत आहे, एखादा नवीन मुद्दा असल्यासही स्वागत.
सर्व माहिती व फोटो आंतरजालावरून, साभार.

Monday, 14 May 2012

कात्रज ते सिंहगड - (K2S) - नाईट ट्रेक

कात्रज जुन्या बोगद्यापासून निघाल्यानंतर एका दृष्टीक्षेपात दिसणारे झगझगीत पुणे...
संपूर्ण वाटेदरम्यान खुणावणारा आणि हुलकावणी देणारा सिंहगडावरील टॉवरचा लाल दिवा...
वाट दाखवणारा शीतल चंद्रप्रकाश...
पौर्णीमेच्या रात्री मध्यानवेळेसारखी पडणारी आपली सावली...
काळेभोर, निरभ्र आणि लुकलुकणार्‍या तार्‍यांनी भरलेले आकाश..
क्षणात चमकून लुप्त होणार्‍या उल्का..
दम लागल्यावर एखाद्या थंडगार कातळावर आडवे होवून फुललेला श्वास आणि शांत वारा यांची घातलेली सांगड...

K2S च्या या आठवणी जाग्या करत वेळेवर स्वारगेट ला सगळे जण जमलो व PMT बस शोधून कात्रज जुन्या बोगद्याकडे प्रस्थान केले.
सूर्यपुत्र, सागर, सूड, पिंगू, मी आणि Trekism चे सहा मित्र मिळून ११ जण होते.
या ट्रेकची सुरूवात होते कात्रज जुन्या बोगद्यावरच्या डोंगरावरून, आम्ही तिथे पोहोचलो तर आधीच दोन ग्रूप आलेले होते, त्यांच्याबरोबर किरकोळ बोलून लगेचच डोंगर चढायला सुरूवात केली.
नुकताच पाऊस पडून गेल्याने थंडगार हवेत आणि मऊ व भुसभुशीत मातीवरून चालायला मजा येत होती.. पण थोडावेळच. माती बुटांना चिकटायला लागली व पाय घसरू लागले. ढगाळ हवेमुळे चंद्र चांदणे काही दिसत नव्हते. काळाशार अंधार होता सगळीकडे.
पहिला डोंगर चढल्यानंतर आपण अशा ठिकाणी असतो जिथून कात्रज जुन्या बोगद्याकडे येणारा रस्ता, कात्रज नव्या बोगद्याकडे येणारा रस्ता व कात्रज तलाव एकाच वेळी दिसतो. यांच्या पार्श्वभूमीवर पसरलेले पुण्याचे दिवे या चित्रात एक वेगळाच परिणाम साधतात.
दुसर्‍या दिशेला दोन्ही बोगद्यांनंतर एकत्र येवून थेट खेड शिवापूरपर्यंतचा रस्ता व सिंहगडाकडे बघितले तर टॉवरचा लुकलुकणारा दिवा.
रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांचे लाईट्स रस्त्याला वेगळीच गती प्राप्त करून देत होते... वळणावळणाचा रस्ता दिव्यांमुळे अक्राळ विक्राळ पसरलेल्या सापासारखा भासत होता

तिथे अचानक हा पहुडलेला दिसला.

मण्यार - "Big Four" ग्रूप मधला एक अत्यंत विषारी. (इंग्रजी नाव - Common Krait)
डोंगर चढताना दम लागत होता. अंधारात टॉर्चच्या मदतीने दिसेल तितकेच दिसत होते. त्यात पहिल्याच डोंगरावर साप दिसल्याने सगळीकडे जास्त काळजीपूर्वक बघितले जात होते.
Wolf Spider - तळहाताएवढा होता हा कोळी.

अचानक काहीतरी चमकले आणि गायब झाले. टॉर्च फिरवल्यावर एक बेडूक दिसला.
अंगावर दोन तीन रंगाचे पट्टे असलेला आणि पायावर विलक्षण सुंदर सोनेरी ठिपके असलेला हा सोन्याबेडूक (Fungoid Frog) याची काही भावंडे अतीजहाल विषारी असल्याने दुरूनच याचे निरीक्षण केले.

पुढे वाटेवर काही वेगळेच पक्षी बसलेले होते.. आम्ही चालताना जवळ गेल्यावर नाईलाज झाल्यासारखे उडून बाजूलाच बसत होते. नक्की काय प्रकार होता आम्हाला कळाले नाही.
तास दीड तासात टंगळ मंगळ करत पाच डोंगरटेकड्या पार झाल्या.

नंतर जेवणासाठी एका रिकाम्या जागेवर गोल करुन बसलो.
जेवणाचा मेनू.. आ हा हा.
चटणी पराठे
ठेपले
चटणी सँडवीच
ब्रेड बटर जॅम
ब्रेड पॅटीस
खजूर
टोमॅटो केचप
कारळ्याची चटणी
जेवणा नंतर सोनपापडी व चिक्की. अधुनमधून तोंडात टाकायला क्रीम बिस्कीटे होतीच.
न ठरवता अचानक पणे जमून आलेला मेनू. सगळ्यांनीच आडवा हात मारला. Smile
आमचे जेवण सुरू असताना बाकीचे ग्रूप येत होते, पुढे जात होते. त्यांचे टॉर्चलाईट लांबून काजव्यांसारखे दिसत, मध्येच लुप्त होत; परत दिसत. अंधारात तो खेळ बघायला वेगळीच मजा येत होती.
जेवणानंतर थंडी जाणवू लागली होती.. हळूहळू चालायला सुरूवात केली.
वाटेत योग्य अंतरावर दिशादर्शक बाण आहेत त्यांच्या व सिंहगडाच्या लाईट्सच्या मदतीने टेकड्या पार करणे सुरू होते. पहिल्या ७ की ८ टेकड्या मोजल्या.. नंतर मोजणे सोडून दिले. Smile

थंड हवेमुळे फारसा दम लागत नव्हता.. वातावरणातल्या गारव्यामुळे घाम येत नव्हता.. टेकड्या व डोंगर चढताना लागलेला दम, वरती पोहोचल्याबरोबर भर्राट वार्‍याबरोबर उडून जात होता.
शेवटी एकदाचे चंद्रदर्शन झाले, वेळ रात्रीचे ०२:४०.
चंद्रप्रकाश आणि अंधाराला सरावलेले डोळे यामुळे थोडावेळ बॅटरी बंद करून चालण्याचा आनंद लुटला. सगळीकडे एक मंद दुधाळ प्रकाश पाझरत होता...
चंद्राकडे बघितले तर चंद्राभोवती खळे तयार झाले होते. फारसे ढगही नव्हते आकाशात. सुंदर दृश्य होते ते.
कांही वेळाने आणखी एक स्नॅक्स ब्रेक घेवून सोनपापडी व क्रीम बिस्कीटांचा फडशा पाडला गेला. (मित्र डिवचत असताना आणि बोलून बोलून हैराण करत असताना सगळीकडे दुर्लक्ष करून डुलकी काढण्याचा आनंद मी १० - १५ मिनीटे अनुभवला. Wink)
दवामुळे गवत ओले व निसरडे झाले होते... बॅगा व बूट सुध्दा भिजले होते. शेवटचे तीन डोंगर बघूनच कस लागणार याची जाणीव झाली होती. नेमके दुसर्‍या डोंगरावर रस्ता चुकलो. तारे आणि सिंहगडचा लाईट यांचा रेफरन्स बघायचे विसरल्याची जाणीव झाली, पण लगेचच रस्ता सापडला.
दवात भिजलेले पान.

ते डोंगर पार करून दोन ट्रॅव्हर्स मारले, अचानक डांबरी रस्ता लागला. आता इथून सिंहगडापर्यंत डांबरी सडकेवरून चालायचे होते. ६ / ७ तास मऊ माती व गवतावरून चालल्यानंतर घट्ट डांबरावरून चालणे एकदम त्रासदायक होते. एखादा किलोमीटर अंतर चालल्यानंतर कंटाळा आला म्हणून एका ठिकाणी टेकलो, अचानक त्या विचित्र वेळी (पहाटे ०४:३०) गडावर जाणारी एक सुमो मिळाली. आम्ही शेवटचे ४ किमी अंतर सुमोने आणि कांही जणांनी चालत पार केले.
पार्कींगजवळ एका झोपडीत गार वार्‍यात तिथल्याच चटईवर अंग टाकले, थोडा वेळ झोप काढली सगळ्यांनीच.
सुर्योदय..

कांदाभजी, बटाटा भजी, पोहे व चहा यांसोबत खुसखुशीत गप्पा, आठवणी, किस्से आणि स्फोटक हसणे यांमुळे थकवा थोडा कमी झाल्यासारखा वाटत होता.
तिथून अतकरवाडी व नंतर घरी.. पुढच्या ट्रेक चे प्लॅन बनवत. Smile

Wednesday, 2 May 2012

कयाकिंग @ पानशेत (Kayaking)

सोमवार ते शुक्रवार हाफिस आणि वीकांत फिरण्यात व्यस्त असताना अचानक १ मे ची सुट्टी जाहीर झाली...
महाराष्ट्र दिन, कामगार दिन (म्हणजेच बैलपोळा Tongue) या गोष्टींना फाट्यावर मारायला लावणारी "Month End" नावाची एक जबरा चीज आहे याची नव्याने जाणीव झाली. पण शेवटी सुट्टी मिळालीच. Smile
पानशेत बोटींग क्लब ला जायचे बरेच दिवसांपासून डोक्यात होते. तेच ठरवून सकाळी ०७ वाजता बाईक हाणायला सुरूवात केली.. वडगांव पुलाजवळ सगळे मित्र जमून डोणज्याच्या दिशेने गाड्या वळवल्या.
डोणज्यापर्यंतचा रस्ता नेहमीसारखाच अरूंद, खड्ड्यांनी भरलेला आणि सिंहगडाच्या दिशेने भरधाव जाणारे पब्लीक यांनी व्यापलेला होता, पण आजूबाजूला असलेला निसर्ग हे सगळे विसरायला लावत होता, उन्हाचा रखरखाट सुरू होता होताच आम्ही नाष्टा करायला थांबलो. मिसळ, पोहे, वडापाव यथेच्छ चापून पानशेतच्या रस्त्याकडे कूच केले..
(फोटो मुद्दामच दिले नाहीयेत - आभार मानल्याबद्दल धन्यवाद Wink)
खडकवासल्यापासून पानशेत धरणापर्यंतचा रस्ता अवर्णनीय आहे. संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या बाजूने नदी आपली सोबत करते.

बोटींग क्लब मध्ये पोहोचल्या नंतर तिथल्या व्यवस्थापकाने आमच्यापैकी एका नेहमीच्या मेंबराला ओळखले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.. आम्ही पाण्यात जायचा मार्ग कुठे आहे - कसे जायचे - कुठून उतरायचे - किती वेळ आहे.. वगैरे "क" च्या बाराखडीत गुंतलो असताना व्यवस्थापक महाशय स्वतःच आमच्या बरोबर आले.
जलाशय खुणावत होताच.


सुरूवात केली पोहोण्यापासून..

लाईफ जॅकेट घालून पोहणे हा बेक्कार अनुभव होता.. पाण्याखाली पोहता येत नव्हते, सूर मारता येत नव्हता आणि तरंगण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नव्हते. Sad
थोड्यावेळाने कयाकिंग सुरू केले.


खूप लांबपर्यंत फेरी मारून, कयाक बरोबर खेळ करून (खेळ करताना कयाक उलटी होता होता वाचवून) काठावर परतलो. येता येता रेस लावण्याचे निष्फळ प्रयत्न केले पण मोटरबोट जवळून गेल्यानंतर उसळणार्‍या लाटेने कयाक सांभाळता सांभाळता पुरेवाट होत होती. रेस दूरच राहिली.
सर्फींग - बोटीमागे दोरीने बांधलेल्या एका सर्फ बोर्डवर आपण झोपून / उभे राहून लांब फेरी मारायची. फेरी मारता मारता वेगाने बोट वेडीवाकडी फिरते, बोट फिरल्याने बोर्ड पण तसाच फिरतो आणि आपण त्याच वेगाने पाण्यात पडतो. Shock



बनाना राईड - सर्फ बोर्डसारखीच मजा. Smile

मनसोक्त पोहणे, कयाकिंग, सर्फींग आणि राईड आवरल्यानंतर थोडा वेळ पाण्यात निवांत पडून राहण्याची मजाही अनुभवली.

पाण्यातून बाहेर येवून गरमागरम खेकडा भजींवर ताव मारला.. Smile

पुन्हा तोच निसर्गरम्य रस्ता टळटळीत दुपारी पार करून पुणे गाठले, उन्हावर उतारा म्हणून बास्कीन रॉबीन्स ला भेट दिली. संध्याकाळचा बार्बेक्यू नेशन कट्टा खुणावत होता.
अधिक माहिती -
१) लाईफ जॅकेट सक्तीचे आहे.
२) कयाकिंग - ३० मिनिटे - रू. १००/-
३) सर्फिंग - १ राईड - रू. १५०/-
४) बनाना राईड - १ राईड - रू. १५०/-
५) पोहणे - फ्री - पण परवानगी नाहीये Shock आम्ही सकाळचे पहिलेच कष्टंबर आणि बराच वेळ फक्त आम्हीच असल्याने आम्हाला पाण्यात उतरू दिले. ते पण लाईफ जॅकेट घालूनच.
६) कयाक घेवून धरणाच्या भिंतीकडे जायला परवानगी नाही.